

कणकवली ः कणकवली नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि सतरा नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या 62 उमेदवारी अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या दालनात छाननी झाली. यावेळी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत सुनावणीअंती फेटाळत समीर नलावडे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. तर प्रभाग क्रमांक 3, 5, 6 आणि 16 या प्रभागातील क्रांतिकारी विचार पक्षाच्या (शहर विकास आघाडी) उमेदवारांच्या अर्जावर त्या त्या प्रभागातील भाजप उमेदवारांनी घेतलेल्या हरकती तसेच प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजप उमेदवाराच्या अर्जावर शहर विकास आघाडीच्या उमेदवाराने घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली. या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाचा 1 तर नगरसेवक पदाचे 7 अर्ज अवैध ठरले. विशेष म्हणजे भाजप आणि शहर विकास आघाडी या दोघांच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी असल्याने भाजप आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयात गर्दी केली होती. यावेळी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला. समीर नलावडे यांना पूर्वीच्या एका गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा झाली असल्याने त्यांची उमेदवारी अपात्र ठरवावी, असा युक्तिवाद संदेश पारकर यांचे वकिल ॲड. गणेश पारकर यांनी केला. त्यावर समीर नलावडे यांचे वकिल ॲड. राजेंद्र रावराणे यांनी बाजू मांडली. श्री.नलावडे यांना पूर्वीच्या गुन्ह्यात झालेल्या शिक्षेविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले होते. त्यानंतर त्यांच्या शिक्षेस उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने न्यायालयाच्याच एका निर्णयानुसार ते निवडणूक लढवण्यास पात्र आहेत असे सांगत याबाबतची जजमेंटही त्यांनी सादर केली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी संदेश पारकर यांच्या वकिलांनी घेतलेली हरकत फेटाळत समीर नलावडे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.
नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीअंती त्यातील समीर अनंत नलावडे (भाजप), गणेशप्रसाद राधाकृष्ण पारकर (लोकराज्य जनता पार्टी), संदेश भास्कर पारकर (क्रांतीकारी विचार पक्ष), संदेश भास्कर पारकर (अपक्ष) आणि सौरभ संदेश पारकर (क्रांतिकारी विचार पक्ष) हे पाच उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत तर भाजपचे दुसरे उमेदवार गणेश सोनू हर्णे यांचा पर्यायी अर्ज अवैध ठरवण्यात आला.
प्रभाग क्रमांक 3 मधील क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार सुमित राणे यांच्या अर्जावर भाजपचे उमेदवार स्वप्नील राणे यांनी, प्रभाग क्रमांक 5 मधील क्रांतीकारी विचार पक्षाच्या उमेदवार स्नेहा वाळके यांच्या अर्जावर भाजपच्या मेघा गांगण यांनी आणि प्रभाग क्रमांक 6 च्या क्रांतीकारी विचार पक्षाच्या उमेदवार सुमेधा अंधारी यांच्या अर्जावर भाजपच्या स्नेहा अंधारी यांनी प्रतिज्ञापत्रावरील सर्व पानांवर नोटरीचे सही शिक्के नसल्याबाबत आक्षेप घेतला होता. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी संबंधित उमेदवारांना त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी दोन तासांचा अवधी दिला होता. त्यामुळे या तीन प्रभागात काय होणार? याची उत्सुकता सर्वांनाच होती. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचा संदर्भ देवून या तिन्ही प्रभागातील हरकती फेटाळल्या.
प्रभाग क्रमांक 11 मधून शहर विकास आघाडीच्या उमेदवार दीपिका जाधव यांनी भाजपच्या मयुरी चव्हाण यांच्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात कारची माहिती लपवल्याबाबतचा आक्षेप घेतला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा संदर्भ देत तोही आक्षेप फेटाळला. प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे उमेदवार संजय कामतेकर यांनी क्रांतिकारी विचार पक्षाचे उमेदवार उमेश वाळके यांच्या अर्जावर बांधकामसंबंधी व सूचकाच्या सहीच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. मात्र, दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळले. आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर असून, अर्ज माघारीनंतरच रिंगणातील उमदेवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.