वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे.वेंगुर्ला तालुक्यात अतिवृष्टीमुळे 1लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान वीज वितरण कार्यालयाने सोमवारी सकाळी 10.30 वाजता मेंटेनन्स साठी विजपुरवठा खंडीत केल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत होती.सायंकाळी 4.30 वाजता विजपुरवठा सुरळीत झाला. तालुका कार्यक्षेत्रात आज एकूण 30 मिमी एवढा पाऊस झाला असून एकूण 2264 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
वेंगुर्ला शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे वेंगुर्ला बंदर येथील व्यावसायिक अजय शंकर कुबल यांच्या मालमत्तेचा पायऱ्यासह काही भाग कोसळून सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबात महसूलचे तलाठी राजेंद्र तांबोसकर यांनी पंचयादी केली आहे. वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, नायब तहसीलदार राजन गवस यांनी नुकसानीची पाहणी केली.तसेच कोचरा येथील सचिन केरकर यांच्या घराचे छप्पर व मातीची भिंत कोसळून 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शहरासह येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून ते प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. भात झोडपणी यंत्र यांचा विद्युत पुरवठा नसल्याने शेतकऱ्याला स्वतः राबून जुनी भात झोडपणी पद्धत अवलंबवावी लागली आहे. वीज व्यवस्था पावसाळ्यात सुरळीत राहण्यासाठी पावसापूर्वी झाडी कटिंग, विद्युत्ततारा चांगल्या वापरणे, नवीन अद्ययावत विद्युतपोल बसविणे, सर्व महसूली गावात पुरेसे वायरमन कार्यरत ठेवणे, चांगल्या दर्जाचे ट्रान्सफॉर्मर बसविणे, प्रत्येक गावात किमान 5 तक्रारबुक उपलब्ध करून ठेवणे ही वीज वितरणची प्रमुख जबाबदारी आहे.
परंतु त्याकडे लक्षच पुरविले नसल्याने वेंगुर्ला शहर तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी जुने टॉवर सुविधा योग्य राखण्यासाठी प्रयत्न न करता नवीन टॉवरच्या मागण्या करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे टेलिफोन यंत्रणाही कोलमडली आहे. वीज वितरणचा दूरध्वनी बंद लागत असून उपभियंता काय काम करीत आहेत, असा सवाल व्यक्त होत आहे. अधिकारी आपल्या ड्युटीवर वेळेत हजर नसल्याने राजकीय पुढाऱ्यांना खुर्चीला हार घालावे लागत आहेत, ही आपल्या वेंगुर्ला तालुक्याची शोकांतिका आहे.
तहसीलदार कार्यालय, वेंगुर्ला पोलीस स्टेशन ही शासकीय कार्यालये वगळता तालुका वीज वितरण कार्यालय, वेंगुर्ला पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या प्रमुख जबाबदार, शासकीय कार्यालयातील दूरध्वनी सेवा कित्येक महिने बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांना ग्रामीण भागातून हेलपाटे मारावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, प्रमुख राजकीय पक्षांचे जिल्हा प्रतिनिधी प्रसन्ना देसाई, सचिन वालावालकर यांनी त्वरित लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.