Sindhudurg news : वेंगुर्ला पं. समितीसाठी त्रिशंकू लढती शक्य!

पं. स. वर कोण वर्चस्व मिळविणार, याकडे सर्वांचे लक्ष
Sindhudurg news
वेंगुर्ला पं. समितीसाठी त्रिशंकू लढती शक्य!file photo
Published on
Updated on

अजय गडेकर

वेंगुर्ला ः वेंगुर्ला पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या या पं. स. वर कोण वर्चस्व मिळविणार, हे महायुती अथवा महाविकास आघाडी यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. यावेळी तालुक्यात पं. स. साठी ठाकरे शिवसेना, भाजप व शिंदे शिवसेना अशी त्रिशंकू लढती होण्याची शक्यता आहे.

वेंगुर्ला पंचायत समितीवर मागील टर्म शिवसेनेचे सभापती राहिले आहेत. यामध्ये ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शिंदे शिवसेनेचे सुनील मोरजकर, तसेच अनुश्री कांबळी या सभापती राहिल्या होत्या. तर काँग्रेसतर्फे व सध्या शिवसेनेचे पदाधिकारी असलेले सिद्धेश ऊर्फ भाई परब व भाजपच्या स्मिता दामले या उपसभापती राहिल्या होत्या. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे अभिषेक चमणकर सभापती राहिले आहेत. तर ठाकरे शिवसेनेच्या सुकन्या नरसुले यांनी जि. प. सदस्य म्हणून उभादांडा मतदारसंघातून प्रभावी काम केले आहे. माजी सभापती तथा जिल्ह्याचे काँग्रेसचे व शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश चमणकर हे तालुक्यात आदर्शवत काम करीत असून उभादांडा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे.भाजपचे विष्णुदास उर्फ दादा कुबल हे जि. प. शिक्षण सभापती होते. त्यामुळे उभादांडा मतदारसंघात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता असून तालुकावासीयांचे या मतदारसंघाच्या लढतीकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील पं. स. ची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी तालुक्यात जमेची बाजू मानली जात आहे.भाजपा नव्याने पं. स. वर सत्ता मिळविण्यास सज्ज आहे. तर शिवसेना आ.दीपक केसरकर यांच्या निर्णयानुसार रणनीती आखणार आहे. एकूण 10 मतदारसंघ असलेल्या या पंचायत समितीवर शिवसेना 5, भाजपा 1, काँग्रेस 2, राणे समर्थक भाजपा 2 असे समीकरण होते.पं. स. सभापतीपद ना. मा. प्र. साठी आरक्षित झाले आहे.नव्याने मातोंड ना. मा. प्र. 1,तुळस ना. मा. प्र. महिला 1, रेडी, शिरोडा, वायंगणी आदी 4 सर्वसाधारण महिला व आडेली, म्हापण, परुळे, आसोली हे 4 सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहेत. नव्याने जाहीर जि. प., पं. स. आरक्षणानंतर अनेक प्रबळ इच्छुक दावेदारांची जि. प. साठी संधी हुकली असली तरी पं. स. साठी संधी आहे.

तालुक्याच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ प्रकाश गडेकर भाजपातर्फे जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण व पं. स. सभापतीपद ओबीसी साठी आरक्षित झाल्याने त्यानुसार त्यांचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या वेंगुर्ला तालुक्यात बहुसंख्य ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यात शिवसेनेचे सहकार्यही मोलाचे राहिले आहे. सध्या महायुती अथवा आघाडीच्या निर्णयानुसार दुरंगी अथवा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातून भाजपतर्फे उभादांडाचे युवामोर्चाचे तुषार साळगावकर, कुशेवाडा सरपंच नीलेश सामंत, युवा मोर्चाचे वैभव होडावडेकर, भाजपचे अजित नाईक, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, शिंदे शिवसेनेतर्फे कोचरा सरपंच योगेश तेली, माजी सभापती कै. आबा कोंडसकर यांचे विश्वासू मितेश परब, ठाकरे शिवसेनेतर्फे आडेली माजी सरपंच भारत धर्णे, संस्कृती धर्णे, मठ माजी सरपंच नीलेश नाईक, भाजपचे अजित नाईक, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, पालकरवाडी माजी सरपंच संदीप चिचकर, आडेलीचे सामाजिक कार्यकर्ते राजू सामंत, शरद पवार गटातर्फे योगेश कुबल, काँग्रेसतर्फे साक्षी कुबल, मठ माजी सरपंच तुळशीदास उर्फ दादा ठाकूर, तसेच मठ माजी सरपंच बंटी नाईक, आडेली ग्रा. पं. सदस्य सुधीर धुरी, गोट्या नाईक, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, माजी सभापती सुचिता वजराटकर, आदी जुने-नवे चेहरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news