वैभववाडी, पुढारी वृत्तसेवा : वैभववाडी तालुक्यात मोठया उत्साहात गुरुवारपासून होळी उत्सवाला सुरुवात झाली आहे. गावागावात होळीच्या मांडावर ( चव्हाट्यावर ) होळी उभारण्यात आली आहे. होळीच्या मांडावर गावच्या ग्रामदैवताच्या पालख्यांचे वाजत गाजत आगमन झाले आहे. (Sindhudurg Holi 2025)
प्रत्येक गावच्या रूढी परंपरेनुसार पुढील पाच, सात दिवस ते अगदी गुढीपाडव्यापर्यंत मांडावर ( चावट्यावर ) देवाच्या पालख्याचा मुक्काम असणार आहे. यादरम्यान दररोज रात्री ढोल ताशाच्या गजरात पालखी नृत्य केले जाते. त्याचप्रमाणे गोमू नृत्य, पारंपरिक डफलीच्या तालावर खेळे नृत्य, तसेच विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तर काही गावातून देवाची पालखी किंवा देवांचे निशाण हे गावातील घरोघरी नेण्याची पद्धत आहे. गावकरी मोठया भक्ती भावाने घरी आलेल्या देवाची पूजा आर्चा करतात. (Sindhudurg Holi 2025)
त्याचप्रमाणे काही गावातील देवाच्या पालख्या या आपल्या जवळच्या नाते संबंधातील देवाच्या पालखीच्या भेटीला जातात. या दोन पालखीच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी दोन्हीही गावातील भाविक मोठी गर्दी करतात. होळी उत्सवासाठी गावात मोठया संख्येने पुणे, मुंबईसारख्या शहरातून चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे वर्षभर बंद असणारी घरे उघडली असून नातेवाईक, मित्रमंडळी, माहेरवाशींनी दाखल होत असल्यामुळे घराघरात आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी होळी देवाला नवस बोलले जातात.