

ओरोस : ज्येष्ठ नागरिक आणि जिल्ह्यात येणार्या पर्यटकांच्या दृष्टीने स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून पर्यटकांना जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणे व आवश्यक पोलिस स्टेशनची माहिती उपलब्ध व्हावी या दृष्टीने या वेबसाईटचा उपयोग होणार आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी कायद्यांतर्गत मार्गदर्शक ठरणारी माहिती तयार करण्यात आली असून नागरिकांना ही वेबसाईट मार्गदर्शक ठरेल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परिषद सभागृहात अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची पत्रकार परिषद झाली. अग्रवाल म्हणाले, मुख्यमंत्रीनी जानेवारीमध्ये 100 दिवसाचा सात कलमी कार्यक्रम सर्व विभागांना दिला होता यामध्ये प्रथम मुद्द वेबसाईट अपडेशनचा होता. सर्व विभागांनी आपापली वेबसाईट अपडेट करायची होती त्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे होते. आपली वेबसाईट आकर्षक असली पाहिजे, वेबसाईट युझर फ्रेंडली इजी टू असली पाहिजेत आणि वेबसाईट सायबरहल्यापासून सुरक्षित असली पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये एका एजन्सी मार्फत वेबसाईट अभ्यासाचे काम सुरू केले. ते काम शेवटपर्यंत आले आहे, अजून थोडं काम चालू असलं तरी ही वेबसाईट आम्ही सुरू केली आहे. आमच्या वेबसाईटचे फिचर आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना काय काय बघायला मिळेल याची माहिती त्याचप्रमाणे लोकांना सुरक्षित पर्यटन साठी सिंधुदुर्ग पोलिसांची कशी मदत घेता येईल या दृष्टीने या वेबसाईट मध्ये फिचर देण्यात आले आहे, असे सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्या पर्यटकांना व अनोळखी व्यक्तींना प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशन सह सागरी किनार्यावरील तसेच जिल्ह्यातील पर्यटन ठिकाणांची माहिती व संपर्क क्रमांक यामुळे मदतीचा हात मिळणार आहे.जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नागरिकांची माहिती पोलीस पाटलांमार्फत गोळा केली असून अजूनही काही पोलीस स्टेशन मार्फत ही माहिती घेण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने कायदेविषयक रुग्णवाहिका व अन्य माहिती उपलब्ध करण्यात आली असून ज्येष्ठांना रुग्णवाहिका, भाडेकरूंना नियमावली, बँकातून रक्कम गेली असल्यास याबाबत कोणत्या नंबर वर कॉल करावा, याची अद्यावत प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सी सी टी व्ही कॅमेरे अद्यावत करण्यात आले असून सन 2019 ते 2024 पर्यंत बसविलेले सर्व कॅमेरे सुस्थितीत आहेत, तर 2016 मधील जुने कॅमेर्यांची दुरुस्ती करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे
सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरे बसविण्याबाबत जिल्हा नियोजन मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. या अंतर्गत जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात 40 ठिकाणी कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्याचबरोबर आंबोली या ठिकाणी अजून ज्यादा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे अग्रवाल म्हणाले.