सावंतवाडी : गेले चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी मध्यरात्री १२ वा.च्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा सावंतवाडी शहरासह वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यांना तडाखा बसला. सावंतवाडी शहरातील २२ इमारतींच्या छप्परांचे पत्रे उडून गेले, तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडून मोठे नुकसान झाले.
शहरातील रामेश्वर प्लाझाच्या इमारतीची भली मोठी शेड श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कैटिन, लॉ कॉलेजच्या इमारतीवर पडल्याने मोठी हानी झाली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. तब्बल २५ लाख २० हजार रुपयांचे नुकसान शहरात झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. शुक्रवारी सकाळी आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी नगरसेवकांसोबत हानी झालेल्या भागाला भेट देत पहाणी केली. आंबोली परिसरातही वादळी पाऊस झाला. या वादळी पावसामुळे शहरासह तालुक्याचा वीजपुरवठा ठप्प झाला होता.
घरावर कोसळले नारळाचे झाड माडखोल-देऊळवाडी येथे गुरुवारी रात्री एका घरावर नारळाचे झाड पडून घराचे छप्पर कोसळले, यात पती-पत्नी, मुलगा व सून जखमी झाले. चंद्रकला लाड, मुलगा अजित लाड व सून तनू लाड अशी त्यांची नावे आहेत. वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. यामुळे तालुक्यांचा ग्रामीण भाग अंधारात गेला होता. महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते.