Ratnagiri | लोटेतील विषबाधेला एमआयडीसी जबाबदार

Lote MIDC Poisoning Case-ग्रामस्थांनी ठेवला ठपका; विषबाधा झालेल्या १७ लोकांना सोडण्यात आले घरी
Lote MIDC Poisoning Case
Lote MIDC Poisoning Case
Published on
Updated on

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीतील चेंबर ओव्हरफ्लो होऊन नळाद्वारे रासायनिक सांडपाणी घराघरात पोहोचले. यामध्ये १७ लोकांना विषबाधा झाली. या प्रकाराला एमआयडीसी आणि सीईटीपीचा गलथान कारभार जबाबदार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, विषबाधीत झालेले १७ ग्रामस्थांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले तर या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

लोटे येथील विषबाधेत पिरलोटे परिसरातील नवीन वसाहत, धामणदेवी, धामणदेवी नवीन वसाहत, लोटे शिवाजीनगर, दीक्षितवाडी, विठ्ठलवाडी, गावठाणवाडी, बौद्धवाडी, खरवली, साईनगर या भागात रासायनिक सांडपाणी नळाद्वारे घराघरात पोहोचले होते. यामुळे लोकांमध्ये भितीदायक वातावरण होते तर काही ग्रामस्थांनी हेच पाणी प्यायल्याने त्यांना उलटी, मळमळ आणि घशामध्ये खवखव सुरू झाली होती. त्यांना लोटे येथील प्रा. आ. केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी दिवसभर उपचारानंतर त्या १७ लोकांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू कली असून सांडपाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर एमपीसीबीकडून कारवाई होणार आहे. हा प्रकार एमआयडीसी आणि लोटे सीईटीपीच्या गलथान कारभारामुळे घडल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पिरलोटे येथील सव्हास रोडलगत असणारा चेंबर गेले एक ते दोन महिने जॅम झालेला होता. त्याची साफसफाई केली जावी अशी मागणी करण्यात येत होती. सुप्रिया लाईफसायन्स कंपनीकडून देखील वारंवार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात येत होते. मात्र, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णतः डोळेझाक केली आणि ब्लॉक असलेला चेंबर साफ करण्यात आला नाही.

अखेर हा चेंबर ओव्हरफ्लो झाला. दुर्दैवाने याची ठिकाणी एमआयडीसीची नळपाणी पुरवठा करणारी लाईन जाते. ती देखील याच भागात लिकेज झाली होती. त्यामुळे ओव्हरफ्लो झालेले रासायनिक सांडपाणी जलवाहिनीत शिरले आणि ते नळाद्वारे घराघरात पोहोचले. लोकांच्या नळाला हिरवे-पिवळे आणि दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी आल्याने लोटेमध्ये एकच घबराट निर्माण झाली. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची गळती काढली असती तर दुर्घअना टळली असती.

त्यामुळे या सर्व प्रकाराला एमआयडीसी जबाबदारी असल्याचा ठपका ग्रामसथांनी ठेवला आहे. त्यामुळे एमआयडीसी व एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या संदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news