Underwater Museum Sindhudurg |  File Photo
सिंधुदुर्ग

Underwater Museum Sindhudurg | सिंधुदुर्गात आशियातील पहिले अंडरवॉटर म्युझियम

Underwater Museum Sindhudurg | निवृत्त युद्धनौका ठरणार जागतिक दर्जाचे समुद्री पर्यटन आकर्षण : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. आशियातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम समुद्री प्रवाळ प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स परिसरात साकारत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशातील सागरी पर्यटन क्षेत्राला नवे परिमाण देणारा ठरणार आहे.

भारतीय नौदलाची अभिमानास्पद युद्धनौका EX INS Guldar ही अनेक दशकांपासून देशसेवेत कार्यरत होती. सेवामुक्त झाल्यानंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील अद्वितीय पर्यटन केंद्रात करण्यात येत आहे. समुद्रतळाशी नियोजित पद्धतीने विसर्जित करण्यात येणारी ही युद्धनौका पर्यटकांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक संपदेचा शाश्वत विकास साधत पर्यटन क्षेत्राला नवे आयाम देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

अंडरवॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्पामुळे देश- विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास या प्रकल्पाचा मोठा हातभार लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. तारकर्ली - इसदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे बोलत होत्या. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, नीपेंद्र नीरव, माझगाव शिपयार्ड, सुनील कोरटी, पाणबुडी तज्ञ, संजय पाटील, अधीक्षक अभियंता, MTDC, जितेंद्र सोनवणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी MTDC, क्षिप्रा बोरा, वरिष्ठ व्यवस्थापक जल पर्यटन एमटीडीसी, दीपक हरणे, व्यवस्थापक बांधकाम एमटीडीसी दीपक माने, प्रादेशिक अधिकारी एमटीडीसी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्राखाली कृत्रिम प्रवाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी जीवसृष्टीला पोषक अधिवास उपलब्ध होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाचा आदर्श निर्माण करणारा हा प्रकल्प जैवविविधतेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.

स्कूबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी जैवविविधतेचा अनोखा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग हे केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित न राहता "अंडरवॉटर टुरिझम डेस्टिनेशन" म्हणून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणार आहे. सागरी पर्यटन, साहसी पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणारा हा प्रकल्प राज्याच्या पर्यटन क्षेत्रासाठीही एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्या म्हणाल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT