Suspicious message India alert
कुडाळ : इंडीया को उडाना है। ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है" असा फोन कुडाळ पोलीस स्टेशनच्या डायल ११२ वर खणखणला. अन् पोलीस प्रशासनानाची एकच तारांबळ उडाली. मात्र तो एक फेक कॉल्स निघाल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला. सध्या सुरू असलेल्या भारत पाक युद्धाच्या अनुषंगाने कुडाळ पोलिसांनी या कॉल्सची तातडीने दखल घेतली.
फोन करणारा व्यक्ती नितीन सहदेव तांबे, वय 50 वर्षे, रा. भडगांव बुद्रुक टेंबवाडी ता कुडाळ. असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत भारत पाक सिमेवर युद्धजन्य स्थिती आहे. अशा स्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सैन्य दल आटोकाट प्रयत्न करत आहे. देशाच्या सिमेवर सुरक्षा यंत्रणा सदैव तत्पर असताना देशांतर्गतही लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष दिल जात आहे. यासाठी पोलीस प्रशासन अशा प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहे. सगळीकडे हाय अलर्ट स्थिती असताना कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीसांची झोप उडवणारा असाच एक फोन शुक्रवारी आला.
शासनाने नागरीकांना आपतकालीन कालावधीमध्ये तातडीची मदत मिळावी याकरीता डायल 112 ही आपतकालीन जलत प्रतिसाद सुविधा कार्यान्वित केलेली आहे. डायल 112 वर नागरीकांनी पोलीस मदत मिळण्याकरीता संपर्क साधल्यावर त्याची तात्काळ दखल पोलीस विभागाकडून घेवून नागरीकांना पोलीस मदत पुरविण्यात येते.
या सुविधेमुळे बऱ्याच नागरीकांना अपघातात , नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच इतर आपत्तकालीन परिस्थितीमध्ये तात्काळ पोलीस मदत पुरविण्यात आलेली असुन बऱ्याच नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेचे रक्षण करण्यात आलेले आहे. परंतु काही नागरीक हे वरील सुविधेचा दुरुपयोग करुन डायल ११२ वर खोटी माहीती देवून पोलीस प्रशासनाचा वेळेचा व मनुष्यबळाचा दुरुपयोग करतात.
दि. ९ मे रोजी रोजी डायल ११२ वर "इंडीया को उडाना है। ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है" असा फोन आला. सद्या भारत पाकिस्तान या देशाचे युदध सुरु असल्याने सदर फोनचा कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गंभीर दखल घेवून तात्काळ हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला.
त्यावेळी हा फोन करणा-या व्यक्तीचे नाव नितीन सहदेव तांबे, वय ५० वर्षे, रा. भडगांव बुद्रुक टेंबवाडीता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने ही माहीती ही खोडसाळपणाने दिलेली असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत या व्यक्तीवर कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या गुन्हयाचा तपास करण्याची मंजुरी न्यायालयाकडून घेण्यात आलेली असुन या आरोपीविरुदध त्याने केलेल्या गुन्हयाबाबत तपास करण्यात येत आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले , उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, जनार्दन झारापकर, संजय कदम, रुपेश सारंग, योगेश मांजरेकर यांनी केलेली आहे.
डायल ११२ ही सुविधा नागरीकांना त्यांचे आपतकालीन कालावधीमध्ये तात्काळ पोलीस मदत मिळावी या हेतुने शासनाने सुरु केलेली आहे. त्यामुळे कोणीही या सुविधेचा दुरुपयोग करुन खोटी माहीती पोलीस प्रशासनाला देवु नये अन्यथा अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिल्या आहेत. हा कॉल्स बनावट असल्याचे लक्षात येताच पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.