कणकवली : यावर्षी जवळपास 8 ते 10 दिवस लवकर गणेशोत्सव आला आहे. या उत्सवाला जेमतेम महिना राहिला असून चाकरमान्यांना गावी येण्याचे वेध लागले आहेत. गणेशभक्त चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग एसटी विभागाने चोख नियोजन केले आहे. आतापर्यंत आरक्षणासाठी 112 गाड्यांची व्यवस्था केली असून त्यातील 54 गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे तर 58 गाड्यांचे बुकींग सध्या सुरु आहे. गतवर्षी चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी सुमारे 250 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षी त्याहून अधिक गाड्या जातील अशी शक्यता आहे.
यंदा गणपती उत्सव 27 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. मुंबईहून येणार्या चाकरमान्यांच्या वाहतूकीचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी मुंबई, ठाण्यातून ग्रुप बुकींगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोकणात यंदा जवळपास सुमारे 5 हजारहून अधिक गाड्या घेवून येणार आहेत. त्याचप्रमाणे चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीही नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई, परळ, बोरीवली, अर्नाळा, पालघर, ठाणे आदी भागात जाण्यासाठी आतापर्यंत 112 गाड्या आरक्षणासाठी सिंधुदुर्ग विभागाने लावल्या आहेत.
या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले असून यामध्ये वाढ होणार आहे. या आरक्षित गाड्यांमध्ये तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांव्यतिरिक्त 65 वर्षाच्या आतील जे पुरुष मंडळी आहेत त्यांना या सवलतीचा लाभ होणार आहे. तर ज्येष्ठ आणि महिलांना त्यांच्या सवलतीचे दर लागू असणार आहेत. सध्या मुंबईला 9 तर पुणे मार्गावर 14 नियमित गाड्या आहेत. त्याव्यतिरिक्त जादा गाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधारणपणे 31 ऑगस्टपासून 9 सप्टेंबर पर्यंत चाकरमान्यांचा परतीचा प्रवास असणार आहे. पुश बॅक सीट असलेल्या लालपरी गाड्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास करणार आहेत.
आतापर्यंत आरक्षणासाठी 112 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. सध्याच्या लालपरीगाड्यामध्ये 40 ते 42 सीटची आसन क्षमता असून गाडीचे 38 सीटचे आरक्षण पूर्ण झाले की दुसरी गाडी आरक्षणासाठी उपलब्ध केली जाणार आहे. कोकण रेल्वेबरोबरच एसटी गाड्यांनाही चाकरमान्यांची मोठी पसंती असते. त्यामुळे एसटीच्या गाड्यांनाही यंदाही चांगला प्रतिसाद मिळेल याचा विश्वास सिंधुदुर्ग विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला.