कणकवली: जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपैकी अत्यंत लोकप्रिय असलेला कणकवली तालुक्यातील निसर्गरम्य 'सावडाव धबधबा' अखेर प्रवाहित झाला आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे धबधब्याचे रूप अधिकच खुलले असून, पर्यटकांची पावले आता साहजिकच सावडावकडे वळू लागली आहेत. मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असले, तरी धबधबा कोसळू लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सिंधुरत्न योजनेतून कायापालट
'सिंधुरत्न' योजनेच्या माध्यमातून सावडाव धबधब्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. हिरवीगार झाडी आणि निसर्गरम्य वातावरणात कोसळणारा धबधबा पर्यटकांना मोहिनी घालत आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि विकेंडला येथे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आंबोली धबधब्यानंतर जिल्ह्यातील एक सुरक्षित आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून सावडावची ख्याती वाढली आहे.
बारमाही पर्यटनाकडे वाटचाल
धबधब्याच्या सुशोभीकरणाचे कौतुक करताना खा. नारायण राणे यांनी, पावसाळ्यानंतरही धबधबा प्रवाहित राहावा यासाठी धरणाचे काम हाती घेतल्याची माहिती दिली होती. जलसंधारण विभागाच्या 'सावडाव धरण प्रकल्पा'चे काम पूर्ण झाल्यानंतर, वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याप्रमाणेच सावडाव धबधबाही बारमाही पर्यटनासाठी सज्ज होणार आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे.
सुविधा आणि रोजगाराची संधी
पर्यटकांच्या सोयीसाठी धबधबा परिसरात लोखंडी रॅम्प, पायऱ्या, प्रसाधनगृहे आणि उत्तम रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यावसायिकांनी येथे दुकाने थाटल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने धबधबा परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणीही केली जात आहे.
ग्रामपंचायतीचे आवाहन
धबधबा प्रवेशद्वारावर ग्रामपंचायतीमार्फत अभ्यागत कर आणि वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग करही आकारला जातो. ग्रामपंचायत व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पर्यटकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पर्यटकांनी नियमांचे पालन करून निसर्गाचा आनंद लुटावा आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच आर्या वारंग, उपसरपंच दत्ता काटे आणि ग्रामपंचायत अधिकारी मधुरा भुजबळ यांनी केले आहे. या निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठी गर्दी होणार असून, यंदाही सावडाव धबधबा पर्यकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.