जबरी चोरी प्रकरणातील चोरटे जेरबंद 
सिंधुदुर्ग

Sindhudurg robbery case : जबरी चोरी प्रकरणातील चोरटे जेरबंद

एलसीबी पथकाची कामगिरी; फोंडाघाट येथे घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : फोंडाघाट - गांगोवाडी येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न करत पसार झालेल्या चोरट्यांच्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवत भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. त्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

जगदीश श्रीराम यादव (25, रा. भिवंडी), चनाप्पा साईबान्ना कांबळे ( रा. 50, वागळे इस्टेट, ठाणे), नागेश हनुमंत माने (48, रा. नेरूळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना फोंडाघाट येथे 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 वा.च्या सुमारास घडली होती. गांगोवाडी येथील तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या. तर तृप्ती यांचा भाऊ मॉर्निंग वॉकला गेला होता. याच दरम्यान हे तिघे जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते.

याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कणकवली पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक समांतरपणे तपास करत होते. संशयितांचा ठावठिकाणा आढळल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तिन्ही संशयितांना सीसीटीव्ही फुटेज,तांत्रिक माहिती तसेच गुप्त खबऱ्यांच्या माहितीवरून शोधून काढले. दरम्यान हे तीन चोरटे मिळाल्याने जिल्ह्यातील आणखी काही चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता आहे.

अवघ्या पाच दिवसांत लावला छडा!

त्या चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या पाच दिवसांत पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे, श्री.कांडर यांनी ही कारवाई केली आहे.

चोरीचा प्रयत्न फसला !

ते चोरटे लिंग्रस यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने बळजबरीने घुसले. तृप्ती लिंग्रस यांच्या मानेला पकडून तिला बेडवर पाडून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न एकाने केला. तर त्यातील एका चोरट्याने तृप्ती हिची आई ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले. तृप्ती हिने चोरट्याच्या हाताचा चावा घेतला. तसेच चोर, चोर अशी जोरात ओरडल्यामुळे भांबावलेल्या चोरांनी तिथून धूम ठोकली. पळून जाताना चोरांनी त्यांच्याकडील कटावणी ,कटर, लोखंडी रॉड घरातच टाकले होते. तसेच एका चोराचे चप्पल सुद्धा घरातच राहिले होते. तृप्ती हिने अंगणात येऊन पाहिले असता चोरांनी पिवळी नंबर प्लेट असलेल्या इर्टीगा कारमधून फोंडाघाट तपासणी नाक्याच्या दिशेने पलायन केले होते. मात्र, चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला होता. मात्र पोलिसांनी कसून तपासाअंती चोऱ्यांच्या मूसक्या आवळल्या.त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवलीचे सहा. पोलिस निरक्षिक ज्ञानेश्वर सावंत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT