कुडाळ : गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... ‘सिंधुदुर्गच्या राजा’चा विजय असो... अशा जयघोषांनी कुडाळ शहर दुमदुमून गेलं आणि ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालात सिंधुदुर्गचा राजा मंगळवारी सायंकाळी भावपूर्ण वातावरणात विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
दरवर्षीप्रमाणे आ. नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून साजरा होणारा हा गणेशोत्सव यंदाही भव्यदिव्य उत्साहात पार पडला. 21 दिवस चाललेल्या या उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध उपक्रमांनी कुडाळकरांना एक नवे आनंदपर्व अनुभवायला मिळाले.
मंगळवारी सायंकाळी 3.30 वा. दरबारातून सुरू झालेल्या विर्सजन मिरवणुकीत आ. नीलेश राणे, पदाधिकारी, राजकीय नेते, महिला पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक सहभागी झाले होते. मिरवणुकीला सजवलेली रथ, ढोल-ताशा, बॅण्ड वाजवणार्या पथकांनी वातावरणात ऊर्जा भरणारी झंकार निर्माण केली. मालवण येथील स्वराज्य ढोल पथक आणि खास बॅण्ड पथकाच्या वादनाने उपस्थितांचे मन जिंकले. कुडाळ पोस्ट ऑफिस चौक, गांधी चौक, भैरवाडी, गुलमोहर हॉटेल, काळपनाका, घावनळे फाटा मार्गे ‘सिंधुदुर्गचा राजा’ पावशी तलावाच्या दिशेने मार्गस्थ झाला.
यंदा ‘लालबागच्या राजा’च्या धर्तीवर कोल्हापूरहून खास मागवलेल्या तराफ्यावर सिंधुदुर्गच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. भाविकांसाठी ही एक अनोखी आणि भावनिक अनुभूती ठरली. मंगळवारी सायंकाळी उशिरा पावशी तलावात यागणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
या मिरवणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संजय पडते, आनंद शिरवलकर, ओंकार तेली, अरविंद करलकर, विनायक राणे, दीपक नारकर, संजय वेंगुर्लेकर, प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, दीपलक्ष्मी पडते, रूपेश कानडे, पप्या तवटे, अभी गावडे, विलास कुडाळकर, चेतन पडते, प्रकाश मोर्ये, आबा धडाम, साक्षी सावंत, गायत्री गोलम, अनिकेत तेंडुलकर, प्रसन्ना गंगावणे, रेवती राणे, स्वरूप वाळके, राजवीर पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि भाविकांनी सहभाग घेतला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 दिवसांच्या गणेशोत्सवाची मोठ्या थाटामाटात फटाक्यांच्या आतषबाजीत ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सांगता झाली. मंगळवारी जिल्हाभरात 331 खासगी तर 6 सार्वजनिक गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात, बेजोच्या तालावर फटाक्यांच्या आतषबाजीत ठिकठिकाणी विर्सजन करण्यात आले. सजवलेल्या वाहनातून पालखीतून गणरायाला निरोप देताना गणेश भक्त काहीसे भावूक झाले होते. नदी नाले ओढे तलाव खाडी किनारी विसर्जन स्थळी लाडक्या बापाला निरोप देत असताना भाविकांनी आरती करत गणपती बाप्पा मोरया चा जयघोषात निरोप दिला एकविस दिवसाच्या या गणेशोत्सवाची सांगता उत्साहात झाली.