ओरोस : जिल्ह्यातील सर्व आठ पंचायत समितींच्या सभापतिपदासाठी आरक्षण मंगळवारी काढण्यात आले. यानुसार जिल्ह्यातील चार पंचायत समितींवर सभापती म्हणून महिला विराजमान होणार आहेत. तर तीन ठिकाणी सभापतिपद खुले आहे. यामुळे काही इच्छुक उमेदवारांमध्ये ‘खुशी’ तर काही उमेदवारांमध्ये ‘गम’ दिसून आले. जिल्ह्यातील नगरपंचायती व नगरपरिषदांचे नगराध्यक्ष आरक्षण पाठोपाठ पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातील सभापती पदासाठी आरक्षण काढण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून हे आरक्षण जाहीर करण्यात आले.
निवडणूक अधिकारी आरती देसाई व अन्य कर्मचारी उपस्थित होते. हे आरक्षण पहिल्या अडीच वर्षांसाठी आहे. त्यात सावंतवाडी अनुसूचित जाती महिला, कणकवली-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वेंगुर्ले नागरिकांचा मागास प्रवर्ग तर मालवण आणि दोडामार्ग पं. स. सभापतिपदे सर्वसाधारण महिला आरक्षित झाली आहेत. कुडाळ, देवगड, वैभववाडी पं. स. सभापती पदे सर्वसाधारण खुली आहेत. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद शाळा नं.1मधील इ. 5 वी चा विद्यार्थी स्वरूप कुमठेकर याच्या हस्ते चिठ्ठ्या काढत हे आरक्षण जाहीर करण्यात आले.