कणकवली : ओसरगाव टोल नाक्यावर खासगी कंपनीकडून वाहनांची नोंदणी करताना कर्मचारी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Osargaon Toll Plaza | सिंधुदुर्गवासीयांवर पुन्हा 'टोल'धाडीचे संकट

Sindhudurg Osargaon Toll Plaza - ओसरगाव प्लाझा येथे टोल वसुलीसाठी निविदा मागवल्या

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : सिंधुदुर्गवासीयांच्या आंदोलनानंतर अडीच वर्षांपूर्वी बंद केलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील ओसरगाव टोल प्लाझावर टोल वसुलीच्या हालचाली पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सुरू केल्या आहेत. यासाठी १७ एप्रिलला ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. जानवली ते पात्रादेवीपर्यंतच्या चौपदरीकरण रस्त्याकरिता ही टोल वसुली होणार आहे. यासाठी ओसरगाव टोल प्लाझा येथे येणाऱ्या-जाणाऱ्या नोंदणीचा प्राथमिक सर्व्हे खासगी कंपनीकडून सुरू आहे.

ओसरगाव टोलनाक्यावर अडीच वर्षांपूर्वी टोल वसुलीसाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली होती. मात्र, महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुली करू नये, सिंधुदुर्गातील वाहनांना टोल माफी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका घेत त्यावेळी टोल विरोधी कृती समिती, व्यापारी संघ आणि राजकीय पक्षांनी टोल वसुलीला विरोध करत आंदोलने केली होती. त्यानंतर टोल वसुली बंद झाली. आता अडीच वर्षांनी पुन्हा महामार्ग प्राधिकरणने टोल वसुलीसाठी निविदा मागविल्याने सिंधुदुर्गवासीय आणि राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

अलीकडेच सिंधुदुर्गात आलेले केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम येत्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच महामार्ग प्राधिकरणने ओसरगाव टोल प्लाझा येथे टोल वसुलीसाठी निविदा मागविल्याने सिंधुदुर्गवासीयांसाठी हा धक्काच म्हणावा लागेल.

जानवली पूल ते पात्रादेवी या सुमारे ६५ कि.मी.च्या मार्ग वापराकरिता ओसरगाव येथे टोल वसुलीसाठी ई-निविदा मागविल्या आहेत. या टोल प्लाझावर संभाव्य वार्षिक महसूल ५७.५८ कोटी रुपये अपेक्षित आहे. २३ एप्रिलपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून, २४ एप्रिलला त्या उघडल्या जाणार आहेत. महामार्गाचे काम सिंधुदुर्गात पूर्णत्वास गेले असले, तरी रत्नागिरीसह अनेक ठिकाणी अद्यापही अपूर्ण आहे. हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोल नाका सुरू करण्याची शक्यता आहे. टोल प्लाझाच्या २० कि.मी.पर्यंतच्या स्थानिक अव्यवसायिक वाहनांसाठी ३५० रुपये असणार आहे. दुचाकी, तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांसाठी टोल वसुली होणार आहे.

हातिवले टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 23 मेपासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टोल संचालनासाठी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी रस दाखवला असून, संबंधित कंपन्यांकडून प्राथमिक सर्वेक्षण व पाहणी केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT