Money Scam Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg news | 'शिवम' घोटाळ्याचे धागेदोरे दोडामार्गपर्यंत; CID चौकशीच्या भीतीने बडे एजंट भूमिगत

लवकरच या तपासाची सुई दोडामार्गातील काही संशयितांकडे वळण्याची दाट शक्यता

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : बेळगावमधील बहुचर्चित ‘शिवम असोसिएट्स’ या आर्थिक संस्थेभोवती आता सीआयडी (CID) चौकशीचा फास आवळला गेल्याने दोडामार्ग तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. भरघोस परताव्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या स्थानिक ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या व्यवहारात कोट्यवधींची मध्यस्थी करणारे काही बडे एजंट अचानक गायब झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी ‘शिवम असोसिएट्स’च्या आर्थिक गैरव्यवहारांचा पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणाची धग आता दोडामार्ग शहरासह ग्रामीण भागातही पोहोचली आहे. या संस्थेत केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर तालुक्यातील माजी सैनिक, काही बडे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे मोठी गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्य सूत्रधाराच्या अटकेने खळबळ, दलालांची झोप उडाली

‘शिवम’चा मुख्य सूत्रधार शिवानंद सिद्धाप्पा नीलणावर याला पोलिसांनी बेड्या ठोकताच, दोडामार्गातील गुंतवणूकदारांसह त्यांना बेळगावची वाट दाखवणारे एजंट, दलाल आणि शिफारसदार यांची झोप उडाली आहे. सीआयडीच्या तपासाची व्याप्ती पाहता, लवकरच या तपासाची सुई दोडामार्गातील काही संशयितांकडे वळण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील काही बड्या असामींच्या घरांवर सीआयडीचे छापे पडू शकतात, या भीतीने अनेक मध्यस्थ सध्या भूमिगत झाले आहेत. यामुळे संपूर्ण तालुक्यात चिंतेचे आणि तणावाचे वातावरण असून, आपले कष्टाचे पैसे परत मिळतील का? या विवंचनेत गुंतवणूकदार सापडले आहेत.

विशेष चौकट: कर्नाटक पोलिसांचे पथक दोडामार्गात?

‘शिवम असोसिएट्स’ प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असतानाच, कर्नाटक पोलिसांचे एक विशेष पथक पहाटेच्या सुमारास दोडामार्गात दाखल झाल्याची जोरदार चर्चा दिवसभर सुरू होती. संशयित एजंट आणि आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यांवर पोलिसांची गुप्त नजर असल्याचे बोलले जात असून, येत्या दोन-तीन दिवसांत दोडामार्गात मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT