सकाळी ८ वा. पासून सुरू होणार टोल वसुली
यापूर्वी तीन वेळा झाला होता टोल वसुलीचा प्रयत्न
जिल्ह्याअंतर्गत नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्क एकेरी दराच्या ५० टक्के
अवाणिज्य वाहनांसाठी मासिक पास शुल्क ३५० रु.
कनकवली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका सोमवार, १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तशी जाहीर सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ८ वा. पासून टोल वसुली सुरू होणार आहे. या टोलनाक्यावर सिंधुदुर्ग पासिंग (MH-07) वाहनांना टोल माफीतून सूट देण्याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारकांना टोल माफ केला जाईल, त्यासाठी वेगळी लेन असेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी २३ जून २०२६ रोजी केली होती. मात्र, सोमवारपासून सुरू होणाऱ्या टोल वसुलीत सिंधुदुर्ग पासिंग (MH-07) वाहनांना टोल भरावा लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जानवली ते पत्रादेवी या ६० किमी लांबीच्या मार्गासाठी हा टोल वसूल केला जाणार आहे. आता, सिंधुदुर्गवासीयांसाठी संपूर्ण टोल माफी करण्याच्या मागणीवर टोलविरोधी कृती समिती आक्रमक असताना दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल वसुली करण्याचे जाहीर केले आहे. ओसरगाव टोल नाका येथील वसुलीचे कंट्रॅक्ट खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांत आतापर्यंत तीन वेळा हा टोल नाका सुरू करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाने दिले होते; मात्र महामार्ग चौपदरीकरणाचे अपूर्ण काम, प्रलंबित नुकसानभरपाई व भूसंपादन मोबदले, सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफी, अशा अनेक मुद्द्यांवर स्थानिक सर्व पक्षीय लोकप्रतिनिधि, नेते मंडळी तसेच नागरिकांनी हा टोल नाका सुरू करण्यास विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर सोमवार, १७ ऑगस्ट रोजी स. ८ वा. पासून टोल वसुली सुरू होणार आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, टोल वसुली विरोधी कृती समिती व वाहन चालक काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.