Sindhudurg News : दोडामार्गच्या आमसभेत धक्काबुक्की, मारहाण!

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण
Sindhudurg News
दोडामार्गच्या आमसभेत धक्काबुक्की, मारहाण!
Published on
Updated on

दोडामार्ग : तब्बल ११ वर्षांनी झालेल्या दोडामार्गच्या आमसभेत जनतेच्या प्रश्नांऐवजी राजकीय राड्यानेच डोके वर काढले. गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित करताच राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे पदाधिकारी रविकिरण गवस यांना शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की व मारहाण केल्याने सभागृहात गोंधळ उडाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

दोडामार्ग येथील सभागृहात आयोजित आमसभेच्या अध्यक्षस्थानी आ. दीपक केसरकर होते. सोबत जि. प.अध्यक्ष प्रमोद कामत, पं.स. सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत उपस्थित होते.

जनतेला रखडलेली विकासकामे, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा व निर्णयांची अपेक्षा होती. मात्र, प्रश्नोत्तरांच्या सुरुवातीलाच राजकीय वातावरण तापल्याने विकासाच्या मुद्द्यावर होणारी चर्चा भरकटली आणि जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू असताना त्यांना व्यासपीठावर कसे बसविले? असा सवाल रविकिरण गवस यांनी केला. रविकिरण गवस यांच्या हातातील माईक काढून घेतल्यानंतर शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली, तर गवस यांना कोणतीही मारहाण झाली नसल्याचा दावा उपसभापती तथा शिंदे शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केला.

सभेतील वाढता गोंधळ पाहून आ.केसरकर यांनी, ज्यांना सभागृहात बसायचे नसेल त्यांनी बाहेर जावे, असे सुनावले. त्यानंतर त्यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. रविकिरण गवस वारंवार खाली बसण्यास सांगूनही ऐकत नसल्याने कार्यकर्त्यांचा संताप वाढला आणि गदारोळ झाल्याचे आ. केसरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय गवस आणि रविकिरण गवस यांनी या घटनेचा निषेध करत 'ही हुकूमशाही आहे, लोकशाही नाही,' अशी टीका केली. दुसरीकडे, गणेशप्रसाद गवस यांनी विरोधकांनी सभा मुद्दाम चिघळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news