मालवण उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : मालवण उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर

स्वीकृत नगरसेवकपदी कांदळगावकर, तोरसकर

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाच्या शिवसेनेचे दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. याचवेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर (शिंदे शिवसेना) आणि मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर (भाजप) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यामुळे स्वतंत्रपणे निवडणूक लढलेले शिंदे शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून सभागृहात एकत्र आल्याचे स्पष्ट झाले.

मालवण नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी दीपक पाटकर यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जाला गटनेत्या पूनम चव्हाण यांनी सूचक, तर सहदेव बापकर यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणताही अर्ज न आल्याने पाटकर यांची निवड बिनविरोध झाली.

निवडणुकीच्या काळात एकमेकांविरुद्ध तीव्र संघर्ष करणाऱ्या शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी बैठकीत महायुतीच्या माध्यमातून सभागृहात एकत्र प्रवेश केला. उपनगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. यामुळे भविष्यात पालिकेचा कारभार महायुतीद्वारे चालणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आगामी विषय समित्यांच्या निवडीत विशेषतः बांधकाम तसेच महिला व बालकल्याण समित्यांमध्ये भाजपला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडीनंतर झालेल्या चर्चेदरम्यान नगरसेवकांनी विविध मुद्द्यांवर प्रशासनाला धारेवर धरले. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी प्रशासकीय काळातील कचरा व्यवस्थापनाची कामे व त्यासंबंधी सादर करण्यात आलेल्या बिलांची चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित ठेकेदारांनी सादर केलेली बिले मंजूर करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंदार केणी यांनी मंजूर विकासकामे आणि त्यांची सद्यस्थिती याबाबत माहिती मागितली. तपस्वी मयेकर यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन करत सभागृहाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने चालवण्याची सूचना मांडली. महेंद्र म्हाडगुत यांनी प्रशासनाने नगरसेवकांना मागितलेली माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विकासकामांना गती मिळेल, अशी मागणी केली.

निवडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचे अभिनंदन केले. मात्र, या अभिनंदन कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले. यावेळी शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेविका मेघा गावकर, निना मुंबरकर, शर्वरी पाटकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, सिद्धार्थ जाधव, सहदेव बापर्डेकर, महेश कोयंडे, भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, सुदेश आचरेकर, ठाकरे गटाचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर तसेच उमेश नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, ज्योती तोरसकर, जगदीश गावकर, जॉन नरोना, राजा गावकर, परशुराम पाटकर, सन्मेष परब, मोहन वराडकर, शेखर गाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवडीमुळे मालवण नगरपालिकेतील सत्ता समीकरणे अधिक स्पष्ट झाली असून, शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय समन्वयातून काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : ममता वराडकर

मालवण शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर आता जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आहे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी सभागृहाचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT