Ladki Bahin Scheme (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Ladki Bahin Scheme | सिंधुदुर्गातील लाडक्या बहिणीं’वर करडी नजर

21,408 लाभार्थी सरकारच्या रडारवर! अपात्र ठरल्यास हप्ता बंद; उद्रेकाच्या शक्यतेने पोलिसही सतर्क

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : एकीकडे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा आनंद साजरा होत असताना, दुसरीकडे राज्य सरकारने याच योजनेच्या हजारो लाभार्थ्यांवर पडताळणीचा फास आवळला आहे. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी, नियमाबाह्य लाभ घेतलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल 21 हजार 408 महिलांची नावे पडताळणीच्या यादीत आली असून, त्यांचे भवितव्य आता अंगणवाडी सेविकांच्या घरोघरी होणार्‍या तपासणीवर अवलंबून आहे.

या पडताळणीनंतर मोठ्या संख्येने महिलांचे अर्थसहाय्य बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाची लाट उसळून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या विशेष सूचना दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

या योजनेचे अर्ज भरण्यापासून ते आता पडताळणी करण्यापर्यंतची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवरच टाकण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांनी लाभार्थींच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने पडताळणीस नकार दिला आहे. मात्र, सिंधुदुर्गात अद्याप तसा नकार आलेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील हजारो घरांचे दरवाजे अंगणवाडी सेविका ठोठावणार असून, त्यानंतर अनेक ’लाडक्या बहिणीं’चा हक्काचा हप्ता सुरू राहणार की बंद होणार, याचा फैसला होईल.

आनंद एका बाजूला, चिंता दुसर्‍या बाजूला

महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी रक्षाबंधनापूर्वी हप्ता जमा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार बुधवारी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने त्यांनी सत्ताधारी ’भावां’चे आभार मानले. मात्र, हा आनंद क्षणिक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण ज्या महिलांच्या पात्रतेबद्दल सरकारला शंका आहे, त्यांची यादी थेट राज्यस्तरावरून जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन या महिलांच्या कागदपत्रांची आणि कौटुंबिक माहितीची काटेकोर तपासणी करणार आहेत.

पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर!

ज्यांचे पैसे यापूर्वीच बंद झाले आहेत, अशा काही महिला सिंधुदुर्गनगरी येथील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात येऊन आपला संताप व्यक्त करत आहेत. आता 21 हजारांहून अधिक महिलांची पडताळणी होणार असल्याने, अपात्र ठरणार्‍या महिलांची संख्या वाढणार आहे. या सर्व महिला एकत्र येऊन आंदोलन किंवा उद्रेक करू शकतात, ही शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने पोलीस यंत्रणेला ’हाय अलर्ट’वर राहण्याचे आदेश दिले आहेत. ’लाडक्या बहिणीं’च्या मुद्यावरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

पडताळणीच्या केंद्रस्थानी ’हे’ मुद्दे:

एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिलांनी किंवा नियमापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

एकाच रेशनकार्डवर नाव असलेल्या दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे का, याची प्रामुख्याने तपासणी होणार आहे.

’कुटुंब’ व्याख्येचा कीस: आई, वडील आणि अविवाहित मुले हे एक कुटुंब, तर विवाहित मुलगा आणि त्याची पत्नी हे स्वतंत्र कुटुंब, या नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली आहे का, हे तपासले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT