कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारातून 21 ते 27 नोव्हेंबरदरम्यान तालुक्यात ‘वनराई कच्चे बंधारे विशेष मोहीम सुरू होणार आहे. मोहिमेचा शुभारंभ ग्रामपंचायत अणाव येथे घाटचे पेड येथे वनराई बंधारा उभारून करण्यात येणार असून ग्रामपंचायत अधिकारी संघटना यात प्रमुख भूमिका बजावणार आहे.
कुडाळ तालुक्याच्या दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी वनराई व कच्चे बंधारे ही एक भक्कम पायाभरणी आहे. ग्रामपंचायतींनी दिलेले लक्षांक शंभर टक्के साध्य करावेत, असे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी आवाहन केले.
विशेष म्हणजे कोणताही शासकीय निधी नसताना शुद्ध लोकसहभाग व श्रमदानाच्या जोरावर 1000 पेक्षा जास्त बंधारे उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तालुक्यात वातावरणाला अक्षरशः जनअभियानांचा साज चढला आहे. कुडाळ तालुक्यातील सर्व संघटनांना घेऊन हा उपक्रम भव्य स्वरूपात यशस्वी करू, असा विश्वास सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब, ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्ष प्रदिप नारकर, सचिव सतीश साळगावकर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.