Bank Fraud News File Photo
सिंधुदुर्ग

Kudal Bank Fraud | 'कमिशन'च्या मोहात बँक खाते दिले भाड्याने; कुडाळचे 3 संचालक गुजरात पोलिसांच्या जाळ्यात

​खात्यांवरून लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार : मोरबी सायबर क्राईमची थेट कुडाळमध्ये धाड

पुढारी वृत्तसेवा

Kudal Bank Fraud

​कुडाळ : केवळ काही टक्क्यांच्या 'कमिशन'च्या आमिषाला बळी पडणे कुडाळमधील तीन संचालकांना चांगलेच महागात पडले आहे. स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तीला वापरण्यासाठी देऊन लाखो रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांना खतपाणी घालणाऱ्या कुडाळ तालुक्यातील तीन फर्म संचालकांना गुजरात पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरीत्या ताब्यात घेतले आहे. भानू गावडे, जनार्दन कुडाळकर आणि संदीप वालावलकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावे असून, या धडक कारवाईने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील एका फर्मच्या या तिन्ही संचालकांनी आपली बँक खाती एका तिसऱ्याच व्यक्तीला वापरण्यासाठी दिली होती. या बँक खात्यांचा वापर करून अज्ञात भामट्यांनी लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा उलाढाल केली. या धक्कादायक गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट गोवा आणि गुजरातच्या मोरबी येथील 'सायबर क्राईम'पर्यंत जाऊन पोहोचले. तेथे याबाबत रीतसर गुन्हा दाखल होताच, गुजरात पोलिसांचे पथक मागावर होते.

​कुडाळमध्ये पोलिसांची थेट धाड

तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुजरात पोलिसांचे विशेष पथक थेट कुडाळमध्ये दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने भानू गावडे, जनार्दन कुडाळकर व संदीप वालावलकर या तिघांनाही तातडीने ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी त्यांना कुडाळ न्यायालयात हजर करून कायदेशीर 'ट्रांझिट वॉरंट' मिळवण्यात आले असून, आता अधिक तपासासाठी गुजरात पोलीस या तिघांचीही गुजरातकडे रवानगी करत आहेत, अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.

​'कमिशन'वर संशयितांचे मौन!

अनोळखी व्यक्तीला बँक खाते वापरण्यास दिल्याच्या मोबदल्यात या तिघांना मोठे 'कमिशन' मिळाल्याची तीव्र शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, पोलिसांच्या पोलिसी खाक्यासमोर आणि विचारपुशीदरम्यान हे तिन्ही संचालक सध्या अवाक्षरही बोलण्यास तयार नसून त्यांनी मौन बाळगले आहे. या खात्यांवरून नेमके किती लाखांचे व्यवहार झाले आणि यामागे कोणते आंतरराज्यीय सायबर रॅकेट कार्यरत आहे, याचा उलगडा आता गुजरात पोलीस करणार आहेत.

सध्या सायबर गुन्हेगार नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती वापरत असल्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांनी आपले बँक खाते, कार्ड किंवा आलेला ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. अशा प्रकारच्या मोहाला बळी पडल्यास थेट गुन्हेगारीत सहभाग मानून कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
- विकास बडवे (पोलीस निरीक्षक, कुडाळ)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT