

कुडाळ : कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेतील अनधिकृत कचरा डम्पिंगविरोधात परिसरातील नागरिकांनी पुकारलेले आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झाले. आता एकही दिवस कचरा टाकू देणार नाही, कचऱ्याचा विषयच संपला, असा आक्रमक पवित्रा घेत 'कचराबाधित डेपो संघर्ष समिती'च्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगरपंचायतीची दोन महिन्यांची मुदतवाढीची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे कुडाळ शहरात कचरा व्यवस्थापनाचा मोठा पेच निर्माण झाला असून, घंटागाड्यांचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सांगिर्डेवाडीतील पाण्याच्या टाकीजवळील खासगी जागेत नगरपंचायतीकडून गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील ओला व सुका कचरा टाकला जात आहे. मात्र, या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया अथवा विल्हेवाट होत नसल्याने परिसरात दुर्गंधी, घाण आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांगिर्डेवाडी, विठ्ठलवाडी, उद्यमनगर, रॉयल पाम, पिंगुळी गुढीपूर, शेटकरवाडी आणि शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी सोमवारी सायंकाळी श्री देव वरंडेश्वर मंदिरात बैठक घेऊन कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने चर खोडून घंटागाड्यांचा मार्ग बंद करण्यात आला.
मंगळवारी सकाळी नागरिक पुन्हा कचरा डेपो परिसरात एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच न. पं. मुख्याधिकारी खंडू पवळ यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांशी चर्चा केली. एमआयडीसीमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्णत्वाकडे असून तो सुरू होईपर्यंत आणखी दोन महिने सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. नगरपंचायतीच्या आगामी कचरा व्यवस्थापन आराखड्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, कचऱ्याचे एकूण पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाणार आहे. चिकन कचऱ्यासाठी बेळगाव येथील कंपनीशी करार करण्यात आला असून मच्छी कचरा 'आकाश फिश मिल'कडे पाठविला जाणार आहे. ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाईल आणि सॅनिटरी वेस्टच्या प्रक्रियेसाठी एका महिन्यात विशेष यंत्रणा दाखल होईल.
तसेच दिवसातून तीन वेळा औषध फवारणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.मात्र, प्रशासनाने यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत नागरिकांनी दोन महिन्यांच्या मुदतवाढीची विनंती अमान्य केली. संबंधित जमीनमालकाने कचरा टाकण्याची पूर्वपरवानगी रद्द केल्याचे निदर्शनास आणून देत, आजपासून नवीन कचरा टाकण्यास पूर्ण बंदी राहील, असा ठाम निर्धार व्यक्त केला. साचलेला जुना कचरा हटविण्यासाठी प्रशासनाला दीड महिन्याचा अवधी देण्याची तयारी नागरिकांनी दर्शविली; पण नियम डावलून कचरा टाकल्यास थेट पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, नागरिकांच्या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेऊन खासगी जागेत कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीला पोलिस संरक्षण देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन दिले. अभय शिरसाट, अमित सामंत, धीरज परब, के. बी. परब, सुरेश राऊळ, नारायण (बाळू) राऊळ, नीलेश परब, भूषण राणे, अमित राणे, उमेश गावडे, फारूक दोस्ती, मुबीन दोस्ती, महेश सुतार, रमेश राऊळ, नरेंद्र राणे, अश्विन पटेल, चंद्रकांत मर्गज, सिलार शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.