कणकवली ः कळसुली - गडगेवाडी येथील विनायक दळवी यांचे बंद घर दिवसाढवळ्या फोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मिळून सुमारे 13 लाख 92 हजाराचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कसुन तपास करत सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित संतोष रामाप्पा नंजन्नावार (रा.शिरोळ,कोल्हापूर, मुळ.हुक्केरी, बेळगाव) याला शिताफीने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याने कळसुलीसह जिल्ह्यातील 17 घरफोड्यांची कबुली दिली असून यामध्ये कणकवली तालुक्यातील सांगवेसह तीन चोर्यांचा समावेश आहे. या चोरट्याकडून 17 घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण 53 लाख 51 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती एलसीबीचे पोलिस निरिक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1.15 वा.च्या सुमारास कळसुली -गडगेवाडी येथील विनायक दळवी कुटुबिय शेतात भात कापणीसाठी गेले असताना संशयित संतोष नंजन्नावार यान त्यांच्या घरात चोरी केली होती. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी या घरफोडीचा समांतर तपास करण्याबाबत एलसीबीला आदेश दिले होते. त्याप्रमाणे एलसीबीने तपास पथके तयार केली होती. पोलिस निरिक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करुन तात्काळ रवाना केली होती. एलसीबीच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी सखोल तपास करुन सीसीटिव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे घरफोडी करणारा वरील आरोपी 8 नोव्हेंबर रोजी निष्पन्न केला होता. त्याला सापळा रचुन शिताफीन शिरोळ-कोल्हापूर येथून अटक करण्यात आली होती.
संतोष नंजन्नावार हा कोल्हापूरचा असून त्याचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. बंद घरांची टेहळणी करुन घरफोडी करणे ही त्याची मोडस आहे. गेल्या जून महिन्यापासून तो तळेरे येथे रुम घेवून राहत होता. त्याच्याकडे दुचाकी आणि कार आहे. जिल्ह्यातील 17 घरफोड्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. या 17 पैकी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न, तीन ठिकाणी रोकड चोरी आणि उर्वरित 13 ठिकाणी सोन्या-चांदीचे दागिने चोरी त्याने केली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 47 लाखांचे दागिने, 1 लाखाची रोकड आणि दुचाकी आणि कार असा मिळून 53 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आल्याचे तपासी अधिकारी हनुमंत भोसले यांनी सांगितले. आरोपी संतोष हा अल्पवयीन असतानाही त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले.