कणकवली : जानवली-कृष्णनगरी येथील ओमकार मधुकर मोहिते यांच्या घरासमोरील अंगणातील स्वयंभू दत्तमंदिराच्या दरवाजाची कुलूप लावलेली कडी चोरट्यांनी कटरने कापून आत प्रवेश करत मंदिरातील धातूची सुुमारे 5 हजार रु. किंमतीची 1 फुटी दत्तमूर्ती चोरली. विशेष म्हणजे चोरटे चोरी करत असताना मंदिरातील सीसीटिव्हीचा सायरन वाजल्याने घाईगडबडीत चोरट्यांनी मूर्ती चोरली. परंतु त्यांच्याकडील 5 राऊंडने (गोळ्या) भरलेले पिस्टल (पिस्तूल) व एक लोखंडी कटावणी तेथेच टाकून पोबारा केला.
ही चोरी शुक्रवारी मध्यरात्री 12.45 ते 1 वा. च्या. सुमारास झाली. दरम्यान भरलेले पिस्टल घेऊन चोरटे चोरी करण्यासाठी आल्याने जानवलीसह कणकवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सध्या सिंधुदुर्गात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वीही चोरट्यांनी कणकवलीत चोर्या केल्याच्या घटना ताज्या आहेत. जानवली-कृष्णनगरी या ठिकाणी मोहिते कुटुंबियांच्या खाजगी मालकीचे स्वयंभू दत्त मंदिर आहे.
या मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. साधारणपणे 25 ते 35 वयोगटातील तिघे चोरटे तोंडाला फडका बांधून मध्यरात्री त्याठिकाणी आले आणि त्यांन मंदिराच्या स्टीलच्या दरवाजाची कुलूप लावलेली कडी कटरने कापून आत प्रवेश करत मंदिरातील धातूची दत्त मूर्ती चोरुन नेली. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी श्री. मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाच्या कड्या बाहेरुन बंद केल्या. ज्यावेळी चोरट दरवाजाची कडी कापत होते. त्यावेळी मंदिरातील सीसीटिव्हीचा सायरन वाजण्यास सुरुवात झाली.
चोरट्यांनी अवघ्या काही सेकंदात कडी कापून मंदिरातील मूर्ती चोरुन पोबारा केल्याचे सीसीटिव्हीत दिसत आहेत. या घाईगडबडीत चोरटे त्यांच्याकडील 5 राऊंडने भरलेले पिस्टल (पिस्तुल) व लोखंडी सळी तेथेच टाकून पळून गेले. दरम्यान सायरनचा आवाज झाल्याने मोहिते कुटुंबियांना जाग आली. ते घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते मात्र दरवाजाला बाहेरुन कडी लावण्यात आली होती. त्यामुळे ओमकार मोहिते याने घरातील आतील जिन्यावरुन टेरेसवर जात तेथून बाहेरच्या जिन्याने खाली दरवाजाच्या कड्या खोलल्या. त्यावेळी मंदिरात चोरी झाल्याचे निर्दशनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. चोरट्यांनी महामार्गालगत गाडी उभी करुन ठेवली होती, त्या गाडीने ते पसार झाले. चोरटे दुचाकी घेऊन आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासहित स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, प्रमोद काळसेकर, हवालदार पांडुरंग पांढरे, विनोद चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. शनिवारी सायंकाळपर्यंत चोरट्यांचा माग लागला नव्हता. याप्रकरणी अज्ञात तीन चोरट्यांविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी आणि कणकवली पोलिस करत आहेत. या घटनेच्या तपासासाठी पथके तैनात केलीत. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.
सीसीटीव्हीचा सायरन वाजल्याने चोरटे पळाले
तीन दिवसांपूर्वी मंदिरात येऊन केली होती रेकी
तीन चोरटे सीसीटीव्हीत झाले कैद
याबाबत पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने श्री. मोहिते यांना मला ओळखलं काय? असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्त मूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. तसेच या ठिकाणचे व्हिडीओ शूटिंग करत फोटोही घेतले होते. त्यानंतर त्यांनी मंदिरातील मूर्ती सोन्याची आहे का? अशी विचारणा केली होती. दरम्यान चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केले असता त्यामध्ये संशयित तिघेजण व तीन तारीखला आलेल्या तरुणांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती आढळत आहेत. त्यामुळे चोरट्यांनी या मंदिराची रेकी केल्याचे माहिती पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.