कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मोरे येथे बंदुका बनविण्याच्या कारखान्यावर कुडाळ पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणाहून परवान्याशिवाय बनविलेल्या बंदुका जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर विक्री झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शांताराम दत्ताराम पांचाळ (४२,मोरे मधली वाडी,या.कुडाळ),आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (३२,रा. माणगांव,या.कुडाळ), यशवंत राजाराम देसाई (५८ वाणेगल्ली,आजरा,जि..कोल्हापुर), प्रकाश राजाराम गुरव (वय ४०,रा.आजरा,जि.कल्हापुर) व सागर लक्ष्मण घाडी (मालवण नांदरुख) या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयाने पाचही जणांना न्यायाधीन कोठडी दिली होती मात्र कुडाळ पोलिसांनी त्या पाचही संशयितांना पुन्हा अटक करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता कुडाळ न्यायालयाने त्यांना दि.७ ऑगस्ट पर्यंत म्हणजे तीन दिवस पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास अधिकारी अनिरुद्ध करीत आहेत.
कुडाळ पोलिसांच्या पथकाने बंदुका बनवण्याच्या कारखान्यावर माणगाव खोऱ्यातील मोरे येथे शनिवारी सकाळी छापा टाकला होता. यावेळी कोणत्याही परवान्याशिवाय बंदुका बनवण्याचे साहित्य आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी शांताराम दत्ताराम पांचाळ (रा.मोरे मधलीवाडी) व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (रा. माणगांव) या दोघांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर यशवंत राजाराम देसाई (वाणेगल्ली,आजरा), प्रकाश राजाराम गुरव ( रा. आजरा), सागर लक्ष्मण घाडी (मालवण नांदरुख) या तिघांना ताब्यात घेत अटक केली व पाचही जणांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी संशयितांच्या नातेवाईकांना लेखी न कळवल्याच्या कारणास्तव न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली होती.
त्यानंतर कुडाळ पोलिसांनी संशयितांच्या नातेवाईकांना लेखी कळविल्यानंतर पुन्हा संशयित पाचही जणांना अटक करून सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार दिनांक ७ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिरूद्ध सावर्डे करीत आहेत.