

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मोरे येथील अनधिकृत बंदूक निर्मिती कारखान्याचे धागेदोरे जिल्ह्याबाहेर पोहोचले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आता या कारखान्यातून बंदुका विकत घेणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला असून, कोल्हापूर आणि मालवण येथील तिघा खरेदीदारांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जप्त केलेल्या एकूण बंदुकांची संख्या नऊवर पोहोचली असून, अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.
कुडाळ पोलिसांनी शनिवारी मोरे येथील कारखान्यावर छापा टाकून मुख्य सूत्रधार शांताराम पांचाळ आणि त्याला साहित्य पुरवणारा आप्पा धुरी या दोघांना अटक केली होती. यावेळी तीन बंदुका, निर्मितीचे साहित्य आणि गवा-सांबराची शिंगे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर करत पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथून यशवंत देसाई आणि प्रकाश गुरव यांना तीन बंदुकांसह, तर मालवण तालुक्यातील नांदरूख येथील सागर घाडी याला दोन बंदुकांसह ताब्यात घेतले.
सर्व पाच आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी जिल्हा न्यायालयात करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. आरोपींच्या मोबाईलमधून बंदुका खरेदीसाठी झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
या कारवाईमुळे अनधिकृत बंदुकांचे जाळे जिल्ह्याबाहेरही पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोठ्या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.