कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अस्तित्वात असले तरी कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक ते तज्ज्ञ डॉक्टरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक कबुली प्रशासनाने दिली आहे. गुदाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त एका रुग्णाला जिल्ह्यात उपचार न मिळाल्याने थेट शासकीय कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे जाण्याची शिफारस करुन रुग्णवाहिकेची व्यवस्था सुद्धा तयार ठेवली आहे.
यासंदर्भात अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे, सिंधुदुर्गनगरी जिल्हा रूग्णालयात कर्करोग आजारावर निदान व उपचार करण्यासाठी ऑन्को सर्जन उपलब्ध नाहीत. त्यामुळे सहायक प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र विभाग यांच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णावर पुढील उपचार संभाजीनगर येथे करण्यात येणार आहेत. हिस्टोपॅथॉलॉजी, सीटी स्कॅन आणि कोलोनोस्कोपी तपासण्यांमध्ये रुग्णास वळषषशीशपींळरींशव रवशपे लरीलळपेार ेष ीशर्लीीां असल्याचे निष्पन्न झाले आहे. आजार गंभीर असताना जिल्ह्यातच उपचार होणे आवश्यक असतानाही, केवळ तज्ज्ञांच्या अभावामुळे रुग्णाला शेकडो किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आहे. या घटनेमुळे वैद्यकीय महाविद्यालय आम्ही आणले अशी मिरवणूक करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. निधी आणल्याचे श्रेय, फोटो आणि भाषणांपुरता विकास मर्यादित राहिला की काय? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. कारण रुग्णाच्या जीवासाठी आवश्यक असलेली ऑन्को सर्जनची नियुक्ती मात्र अजूनही कागदावरच अडकलेली आहे.
फक्त श्रेय घेणारे नव्हे, तर जबाबदारी घेणारे नेतृत्व कधी मिळणार?
सिंधुदुर्गसारख्या दुर्गम जिल्ह्यातील रुग्णासाठी छत्रपती संभाजीनगरचा प्रवास म्हणजे केवळ अंतर नाही, तर खर्च, कुटुंबाची फरफट आणि मानसिक छळ आहे. रुग्णवाहिका दिली म्हणजे जबाबदारी संपली अशा मानसिकतेतून प्रशासन आणि निर्णयक्षम मंडळी बाहेर येणार का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. हा प्रकार केवळ एका रुग्णापुरता मर्यादित नसून, उद्या कोणालाही कर्करोग झाल्यास त्यालाही जिल्ह्याबाहेरच पाठविले जाणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालय हे नावापुरते न राहता प्रत्यक्षात कार्यक्षम करण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी ती कधी स्वीकारणार, असा प्रश्न सिंधुदुर्गवासीय विचारत आहेत. आरोग्याच्या बाबतीत फक्त श्रेय घेणारे नव्हे, तर जबाबदारी घेणारे नेतृत्व कधी मिळणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.