

सावंतवाडी ः सावंतवाडी शहरात बाहेरून येऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांमुळे स्थानिक भाजी विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत रविवारी सायंकाळी स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिरोडा नाका परिसरात ही घटना घडली. परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना तत्काळ उठवण्यात आले.
आम्ही नियमितपणे नगरपालिकेला भाडे भरतो, परंतु बाहेरून येणारे विक्रेते शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या बसून भाजी विक्री करत असल्यामुळे आमच्याकडे ग्राहक येत नाहीत. यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा स्थानिक भाजी विक्रेत्यांनी केला. या संदर्भात अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने आम्हाला स्वतःहून पाऊल उचलावे लागले, असे त्यांनी सांगितले.
यापुढे बाहेरून येणारे भाजी विक्रेते शहरातील कोणत्याही ठिकाणी बसून विक्री करताना आढळून आल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशाराही स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दिला. नगरपरिषदेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्थानिक भाजी विक्रेत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगरसेवक अजय गोंदावळे यांनी घटनास्थळी जात पाहणी करत परप्रांतीय भाजी विक्रेत्यांना उठविण्याचे आदेश दिले. तसेच यापुढे स्थानिकांवर कुठला ही अन्य होणार नाही याची आपण दखल घेऊ असे आश्वासन दिले.