सगुण मातोंडकर
मळगांव : किनारी भागात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. या थंडीमुळे आंबा कलमे मोहरण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे. आंबा कलमांना काही प्रमाणात पालवी फुटली असून मोहोर फुटण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, परतीचा पाऊस लांबल्याने यंदाचा आंबा हंगाम उशीराने सुरू होणार आहे.
या वर्षी जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. यामुळे एकीकडे मच्छीमारी हंगाम थंडावला होता, तर दुसरीकडे आंबा बागायतदार काहीसे चिंतेत होते. पावसाळ्यात आंबा कलमांना आलेली पालवी आंबा मोहोर विलंबाने येण्यास कारणीभूत ठरत आहे. ऑक्टोबर अखेरनंतर मोहर येण्याच्या कालावधीत पावसाळी वातावरण तयार झाल्याने कीडरोगांचा प्रादुर्भाव आंबा बागायतीवर झालेला दिसून येतो. त्यामुळे आंबा बागायतदारांनी आंबा पिक संरक्षणासाठी फवारण्या सुरू केल्या आहेत. आंबा कलमांना मोहोर येण्यासाठी दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आवश्यक असते, मात्र पावसाळा लांबल्याने आंबा मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण ऑक्टोबर महिन्यात तयार झाले नाही.
दरम्यान नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस थांबल्याने गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात थंडी पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे आंबा मोहरासाठी पोषक वातावरण बनायला सुरुवात झाली आहे. किनारपट्टी भागात सध्या अंगाला झोंबणारे थंड वारे वाहत आहेत. सकाळच्यावेळी हवेत चांगला गारठा पसरलेला असतो. जिल्ह्यात सध्या सरासरी कमाल तापमान 28 अं. तर किमान तापमानाचा पारा 10 अं. सेल्सीअस पर्यंत उतरत आहे. हे वातावरण आंबा मोहरासाठी पूरक असून आंबा कलमांवर तुरळ मोहोर डोकावू लागला आहे, तर काही झाडांना पालवीही दिसत आहे.
झाडांना आलेली पालवी टिकून त्यामधून जोमदार मोहोर बाहेर पडावा, यासाठी खबरदारी म्हणून बागायतदारांनी मोहर संरक्षण फवारणी सुरू केली आहे. तर काही प्रगतशील आंबा बागायतदारांचे फवारणीचे नियोजन यापूर्वीच सुरू झाले आहे. थंडीचे वातावरण असेच कायम राहिले तर येत्या आठ दिवसांत आंबा कलमे मोहराने लगडलेली दिसतील, असा विश्वास आंबा उत्पादकांना आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर टिकवून त्यातून उत्तम फलधारणा होण्यासाठी बागायतदार काळजी घेत आहेत.
हंगामातील सुरुवातीच्या आंबा फळांना बाजारात तुलनेत अधिक दर मिळतो. त्यामुळे वाढीव दराचा लाभ मिळविण्यासाठी बागायतदारांची धडपड असते. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात आंबा कलमांना चांगला मोहोर येण्यासाठी आंबा बाग व्यवस्थापनावर अधिक भर दिला जातो. यामध्ये खते देण्याचे व फवारणीचे वेळापत्रक कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काटेकोर पाळले जाते. सध्या फवारणीसाठी मोहर संरक्षक प्रतीजैवकांना बाजारात वाढती मागणी आहे. या बरोबरच फवारणीसाठी लागणारे पंप तसेच अन्य साहित्य खरेदीसाठीही बागायतदारांची कृषी साहित्य केंद्रांमधून गर्दी दिसत आहे. याबरोबरच फवारणी व पुढील कामांसाठी कामगार आवश्यक असल्याने बागायतदार कामगारांच्या योधात आहेत. स्थानिक कामगार पुरेश्या प्रमाणात मिळत नसल्याने बागायतदार आता नेपाळी किंवा बिहारी कामगारांना प्राधान्य देत आहेत.