ओम देसाई
दोडामार्ग ः कळपातून विभक्त झालेला ‘ओंकार’ हत्ती ‘गणेश’ टस्करच्या दिशेने कूच करत असल्याने, दोघांमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची भीती शेतकरी व ग्रामस्थांमध्ये होती. मात्र,अंदाजा प्रमाणे एकत्र आलेल्या या दोन्ही हत्तींनी द्वंद्व न करता काही वेळ एकत्र धालवत ते पुन्हा विभक्त झाले. आपल्या कळपाचा प्रमूख ‘गणेश’ ’या टस्कारशी भेट झाल्यानंतर ‘ओंकार’ पुन्हा कळपापासून विभक्त झाला. त्यामुळे तो नेमका कोणाच्या शोधात आहे? की गणेशला घाबरून तो पुन्हा विभक्त झाला नसावा ना? असे अनेक कयास यानिमित्त् बांधले जात आहेत.
शुक्रवारी सकाळी गणेश टस्कर एक छोटी मादी, एक मोठी मादी आणि दोन पिल्ले यांच्या सोबत हेवाळे परिसरात वावरत होता. त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 4 वा. च्या सुमारास मेढे परिसरात ओंकार हत्ती दिसून आला. गणेश टस्कर ज्या भागात होता, त्याच दिशेने ओंकारची वाटचाल सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. जर हे दोन हत्ती आमने-सामने आले तर त्यांच्या लढाईत मानवी वस्ती, शेती, घरे आणि जीवितहानीपर्यंत होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती.यामुळे वनविभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते.
दरम्यान, अंदाजानुसार शुक्रवारी रात्री मेढे परिसरातील ‘ओंकार’ थेट ‘गणेश‘ टस्कर व कळपाला जाऊन मिळाला. यावेळी त्यांच्यात द्वंद्व होईल असे सर्वांनाच वाटत होते. मात्र आश्चर्य म्हणजे त्यांच्यात कोणताही संघर्ष झाला नाही. तब्बल े तीन तास ‘ओंकार’ कळपा सोबत होता. त्यानंतर पहाटे ‘गणेश’ टस्कर व कळपाने पाळये गावाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. तर ‘ओंकार’ त्यांच्या विरूद्ध दिशेने मेढे परिसराच्या दुसऱ्या बाजुला निघून गेला. विशेष म्हणजे गणेश सोबत असलेली मोठी मादा हत्ती ही ‘ओंकार’ची आई आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कळपातून वेगळा राहिलेला ओंकार आता कळपातच स्थिरावेल, असा अंदाज ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून होता. मात्र पुन्हा तो कळपापासून दूर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये झालेल्या गणेश व ओंकार यांच्यात तिलारी परिसरात द्वंद झाले होते. त्या लढाईत ‘ओंकार’ पराभूत झाल्याने ‘गणेश’ टस्काराने त्याला कळपातून पिटाळून लावले होते. तेव्हा पासून ‘ओंकार’ हा एकटाच भटकत आहे. त्यामुळे ओंकार अजूनही गणेशला घाबरत आहे? की तो अन्य हत्तींच्या शोधात भटकंती करत आहे, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकीकडे संघर्ष टळल्याचा दिलासा असला, तरी ओंकारच्या अनिश्चित हालचाली आणि गणेश टस्करचा दबदबा पाहता तिलारी खोऱ्यातील जंगलात तणाव अद्याप कायम आहे. वनविभागाने सतर्क राहून वेळेवर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा हत्तीबाधित गावांतील शेतकरी व ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.