जिल्ह्यातील निवडणुकांचे वातावरण तापू लागले! File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Politics : जिल्ह्यातील निवडणुकांचे वातावरण तापू लागले!

आरोप-प्रत्यारोप आणि टोले-प्रतिटोले सुरू

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. टोले-प्रतिटोले सुरू झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तक्रारीही सुरू झाल्या आहेत. युती का तुटली यावरूनही आरोपांच्या फैरी सुरू आहेत. एका बाजूला हे सर्व वातावरण असताना दुसऱ्या बाजूला मात्र उमेदवार कंबर कसून प्रचाराच्या कामाला लागले आहेत. घरोघरी प्रचार हीच सध्याची निवडणुकीची स्ट्रॅटेजी दिसते आहे.

भाजपने सुरुवातीपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली होती. युती होण्याबाबत बैठका झाल्या; परंतु युती काही झाली नाही. आता युती का झाली नाही यावर घमासान सुरू झाले आहे. शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे युती तुटली, असा आरोप केला होता. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आ. नीलेश राणे यांचा आरोप चुकीचा असून शिवसेनेनेच परस्पर नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केल्याचा पलटवार केला.

वादात न अडकता पालकमंत्र्यांकडून विकासाचे मुद्दे

दरम्यान शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे पत्रकारांशी बोलताना आमदार निलेश राणे यांच्या आरोपांना प्रभाकर सावंत यांनी उत्तर दिले आहे. युतीधर्म पाळणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. युतीवर काही परिणाम होईल असे कुणी वक्तव्य करू नये असे आवाहन करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही वादात न अडकता विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविण्याची स्ट्रॅटेजी पालकमंत्री नितेश राणे यांनी अवलंबल्याचे दिसते आहे. आपले कणकवलीचे उमेदवार समीर नलावडे हे उत्तर देण्यास सक्षम आहेत असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

आ.निलेश राणे यांना समीर नलावडेंचे प्रत्युत्तर

समीर नलावडे यांच्या घरात बोगस मुस्लिम मतदार आहेत, असा आरोप आ.निलेश राणे यांनी केला होता. या आरोपाला समीर नलावडे यांनी उत्तर दिले आहे. आ.निलेश राणे जेव्हा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांना याच मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे ते बोगस मतदार नाहीत. आ.निलेश राणे हे दर दोन दिवसांनी कणकवलीत येणार असे त्यांनी जाहीर केले आहे. दर दोन दिवसांनी कशाला त्यांनी कणकवलीतच येऊन रहावे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया समीर नलावडे यांनी नोंदवली आहे.

सावंतवाडीतील वातावरणही तापतंय

सावंतवाडी शहरातही निवडणूक वातावरण हळूहळू तापत आहे. भाजपच्या उमेदवार श्रध्दाराजे भोसले यांना मराठी बोलता येत नाही तर त्या नगरपालिकेचा कारभार कसा करणार? असा सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम भाजपकडू होत आहे. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनीही सावंतवाडीच्या निवडणूक रिंगणात ताकदीने उतरण्याचे ठरविले आहे. त्याचवेळी भाजपने सर्व ताकदीनिशी आपली निवडणूक यंत्रणा कामाला लावली आहे.

वैभव नाईक यांची तक्रार आणि...

ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी आमदार वैभव नाईक यांनी आ.निलेश राणे यांची अतिरिक्त सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर मात्र मंत्री नितेश राणे यांनी यावर निवडणूक आयोग काय तो निर्णय घेईल, परंतु कणकवलीत एकत्र येवून मालवणात एकमेकांविरोधात लढत असल्याचे दाखवून वैभव नाईक आपल्या कार्यकर्त्यांची फसवणूक करत आहेत असा आरोप केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT