Dodamarg to Vijghar State Highway Pudhari
सिंधुदुर्ग

Sindhudurg News | ‘गुप्त बैठकी’मुळे संशयाचे सावट: दोडामार्ग - विजघर रस्ता कामावरून वातावरण तापले

बेठकीपासून विरोधक, स्थानिक सरपंच, नगरसेवक आणि पत्रकारांना दूर ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

Dodamarg to Vijghar State Highway

दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर या राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामावरून तालुक्यात आधीच नाराजीचे वातावरण निर्माण झाले असताना तहसीलदारांच्या दालनात पार पडलेल्या एका कथित ‘गुप्त बैठकी’मुळे वाद अधिकच चिघळला आहे. या बैठकीस ठेकेदार, संबंधित विभागाचे अधिकारी आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र विरोधक, स्थानिक सरपंच, नगरसेवक आणि पत्रकारांना दूर ठेवण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी आयोजित करण्यात आली, याबाबत स्पष्टता नसून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली की काही मोजक्या लोकांच्या फायद्यासाठीच निर्णय घेतले गेले, अशी शंका व्यक्त केली जात आहे. बैठकीतील निर्णयांविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने गूढ अधिकच वाढले आहे.

दरम्यान, दोडामार्ग-विजघर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असले तरी त्याबाबत सत्ताधारी व प्रशासन वगळता इतरांना माहिती नसल्याची टीका होत आहे. काम निकृष्ट दर्जाचे असून नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ, विरोधक आणि वाहनचालकांकडून केला जात आहे. तसेच रस्त्याच्या कामामुळे अपघातांची मालिका सुरू झाली असून काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दोन महिन्यांपूर्वी सर्व संबंधितांची बैठक घेण्याचे जाहीर केले होते. मात्र कामाचा संथ वेग, वाढते अपघात आणि दर्जाबाबतच्या तक्रारींमुळे नागरिकांचा संताप वाढत गेला. आंदोलनाचा इशारा मिळताच प्रशासनाने तत्काळ हालचाल करत तहसीलदारांनी सोमवारी स्वतःच्या दालनात बैठक बोलावली. या बैठकीस केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले, तर इतर लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांना दूर ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विरोधकांना डावलल्याची चर्चा

हा मार्ग अनेक गावांतून जात असूनही संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना बैठकीत सहभागी होऊ दिले नाही, अशी माहिती समोर येत आहे. बैठकीत एकाही विरोधी पक्षाच्या प्रतिनिधीचा सहभाग नसल्याने त्यांना जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा रंगली आहे.

रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह

मंजूर आराखड्यानुसार सात मीटर रुंद रस्ता व दोन्ही बाजूंना दीड मीटर बाजूपट्टी असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात काम तसे होत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मार्गालगतची धोकादायक झाडे अद्याप हटवलेली नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. साटेली-भेडशी आणि दोडामार्ग या प्रमुख बाजारपेठांमधून रस्ता कसा जाणार, याबाबतही स्पष्टता नाही. यासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी करूनही प्रशासनाकडून उत्तर मिळालेले नाही.

सध्या ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने अपघात वाढत आहेत. पावसाळ्यापूर्वी किती काम पूर्ण होणार आणि भविष्यात अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केवळ सत्ताधाऱ्यांनाच निमंत्रण का?

सार्वजनिक विषयावर बोलावलेल्या बैठकीत केवळ सत्ताधाऱ्यांनाच निमंत्रित का करण्यात आले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याविषयी स्पष्टता नसल्याने प्रशासनावर टीका होत आहे. वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन लवकरच आणखी एक बैठक आयोजित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT