Devgad LCB Illegal Liquor Seizure Pudhari
सिंधुदुर्ग

Devgad Liquor Raid | देवगडमध्ये 'एलसीबी'ची मोठी कारवाई; ७.१८ लाखांची गोवा-महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त

तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sindhudurg Devgad LCB Illegal Liquor Seizure

देवगड: सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने देवगड पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ७ लाख १८ हजार ५६० रुपयांची गोवा व महाराष्ट्र बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० जून २०२६ रोजी रात्री १०.०५ वाजण्याच्या सुमारास देवगड तालुक्यातील मिठबाव येथील वळंजू यांच्या कॉम्प्लेक्समधील एका खोलीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकला. या कारवाईत गोवा व महाराष्ट्र बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ७,१८,५६० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी श्रीकांत चव्हाण (रा. मिठबाव, ता. देवगड), विनोद वळंजू (रा. देवगड) आणि पप्पू कुडतरकर (रा. कुडाळ) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई), ८१ व ८३ अन्वये देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन डिसोजा, बस्त्याव डिसोझा, आशिष जामदार तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

बेकायदेशीर मद्यसाठा आणि तस्करीविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT