

कणकवली : कणकवलीत मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे सायंकाळी कणकवली न.पं.च्या जुन्या भाजी मार्केट इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. मंगळवारी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी तातडीने घटनास्थळी येऊन इमारतीच्या कोसळलेल्या भागाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जुन्या भाजी मार्केटची संपूर्ण इमारत जीर्ण झाली असून तीचे आयुष्य संपले आहे. काही व्यापारी याच इमारतीत व्यवसाय करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इमारतीची केवळ डागदुजी करुन प्रश्न सुटणार नाही तर ५० वर्ष जुनी झालेली इमारती तातडीने निर्लेखित करणे आवश्यक आहे.
व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची सुरक्षित व्यवस्था केली जाईल, तसेच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करुन या ठिकाणी सुसज्ज नवीन व्यापारी संकुल उभारण्यात येईल. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जीर्ण इमारत हटवण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले. राजेंद्र पेडणेकर, अनिल मेस्त्री, आबा दुखंडे, राजेंद्र म्हापसेकर, संतोष काकडे, सचिन कुवळेकर, संतोष महाजन, जमील कुरेशी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.