Sindhudurg Mango Market
देवगड : डिसेंबर महिन्यात कडाक्याचा थंडीमुळे आंबा कलमे मोठ्या प्रमाणात मोहरल्यामुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, बागायतदारांच्या आशाची पुरती निराशा झाली. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे फळांचा राजा असलेला हापूस आंबा संकटात सापडला व यामुळे आंबा बागायतदार व व्यापारी यांच्यावर आस्मानी संकट कोसळले.
नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन कमालीचे घटले. फेब्रुवारी महिन्यात बाजारपेठेत दाखल होणारा आंबा हा गुढीपाडव्यानंतर बाजारपेठेत दाखल झाला. मात्र, आंब्याचे उत्पादन कमी असूनही सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचे दर आवाक्यात आले आहे. तर वाशी मार्केटमध्ये कमी उत्पादन असूनही आंब्याचे दर पुर्णत: कोलमडले आहेत, अशी माहिती आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली.
सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचा दर ७०० ते १ हजार रूपये प्रति डझनी असून १५ मे पर्यंत बाजारपेठेत आंबा असेल अशी शक्यता स्थानिक आंबा विक्रेते सदा बाणे यांनी व्यक्त केली.
यावर्षीचा आंबा हंगाम पूर्णत: संकटात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पीक संकटात आल्याने आंबा बागायतदारांवरही आस्मानी संकट कोसळले. यावर्षी १५ ते २० टक्केच आंब्याचे उत्पादन झाले, अशी माहिती जोशी यांनी दिली.
यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आंबा ३० टक्के महाग झाला. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तयार झालेला आंबा बागायतदार वाशी मार्केटमध्ये पाठवित होते. यावर्षी गुढीपाडव्यानंतर आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला. स्थानिक बाजारपेठेमध्येही १५ मार्चनंतरच आंबा विक्रीसाठी दाखल झाला. सध्या स्थानिक बाजारपेठेत आंबा कमी प्रमाणात असला तरी दरही आवाक्यात आहेत. गतवर्षी एका डझनाला ५०० रूपयेपासून दर होता. यावर्षी आंबा कमी असूनही दर ७०० ते १ हजार रूपये डझन आहेत.
मुंबई वाशी मार्केटमध्ये मात्र कमी उत्पादन असूनही आंब्याचे दर गडगडले असून आंबे खरेदी विक्री करणारे दलाल सध्या कर्नाटक मधील आंबे देवगड हापूसच्या नावाखाली विकत आहेत.सध्या आंब्याचा ५ डझन पेटीला १८०० रूपयेपर्यंत दर असल्याने वाशी मार्केटमध्ये आंब्याचे दर पुर्णत: गडगडले आहेत, अशी माहिती आंबा बागायतदार जोशी यांनी दिली.
स्थानिक बागायतदार हा पुणे व मुंबई या ठिकाणी स्वत: विक्री करण्यासाठी घेवून जात असलेल्या आंब्याला १२०० ते १५०० रूपये प्रतिडझनी दर आहे, मात्र वाशी मार्केटमध्ये पूर्णत: दर कोसळला आहे. कमी उत्पादनाच्या मानाने आंब्याला दर मिळणे आवश्यक होते. मात्र, दलालवर्गाकडून आंब्याला अपेक्षित दर मिळाला नाही, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली.
सध्या बाजारपेठेत दाखल झालेला आंबा हा अजून १५ ते २० दिवस असण्याची शक्यता जामसंडे येथील स्थानिक आंबा विक्रेते सदा बाणे यांनी सांगितले. सध्या आंब्याचा व्यवसायालाही सुरूवात झाली असून ५० ते ५५ रूपये किलो असा कॅqनगचा आंब्याचा दर असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यटनाच्या निमित्ताने देवगडमध्ये दाखल झालेले कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील नागरिक स्थानिक बाजारपेठेत आंबे खरेदी करीत असून शाळांना सुट्टी पडल्यानंतर बाजारपेठेत आंबे खरेदीसाठी गर्दी असेल, असे बाणे यांनी सांगितले. सध्या देवगड तालुक्यात आंब्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या जामसंडे बाजारपेठेत आंबा खरेदीसाठी मोठी वर्दळ असल्याचे दिसून येत असून सायंकाळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.