Vengurla Police Sagari Kavach Operation
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी प्रशासनाने बुधवारी (दि.१९) सकाळपासून गुरुवारी (दि.२०) सायंकाळपर्यंत ‘सागर कवच सुरक्षा-2’ या अभियानाची घोषणा केली होती. या मोहिमेत वेंगुर्ला पोलिस ठाण्याने अत्युत्तम कामगिरी करत आपले सागरी सुरक्षा कवच अभेद्य असल्याचे सिद्ध केले.
अभियानाची सुरूवात बुधवारी पहाटे सहा वाजता होताच जिल्ह्यातील सर्व किनाऱ्यांवर सुरक्षा तपासणी वाढवण्यात आली. फक्त चार तासांतच सकाळी दहाच्या सुमारास वेंगुर्ला हद्दीतील उभादांडा वरचेमाड समुद्रकिनारी संशयास्पद बोट दिसल्याची माहिती मिळाली.
पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोट आणि त्यावरील व्यक्तींची चौकशी केली. तपासात ती व्यक्ती ‘रेड टीम’ची असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कारवाई करण्यात आली.
या जलद प्रतिसादातून वेंगुर्ला पोलीस ठाण्याची सजगता आणि सागरी सुरक्षेवरील पकड स्पष्टपणे दिसून आली. ‘सागर कवच सुरक्षा-2’ हे अभियान आज (दि.२०) सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 36 तास अखंडितपणे राबविण्यात येणार आहे.