खैराची तस्करी करणारी टोळी गजाआड pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Khair Wood Smuggling | पत्रादेवी येथे 14 लाखांचे खैर लाकूडसह टेम्पो जप्त

Sindhudurg Khair Wood Smuggling | वन विभाग पथकाकडून पाठलाग करत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बांदा : पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग परिसरातून विनापरवाना खैर वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वन विभागाने धडक कारवाई करत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किंमतीचे खैर लाकूड जप्त केले. या कारवाईमुळे खैर तस्करांचे धाबे दणाणले आहेत. वन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती की, एमएच ०७-१४७५ क्रमांकाच्या टेम्पोमधून विनापरवाना खैर लाकूड वाहतूक होणार आहे.

त्यानुसार वनपरिमंडळ आजगाव व बांदा येथील कर्मचाऱ्यांनी बांदा फॉरेस्ट चेकपोस्ट तसेच इन्सुली खामदेव नाका परिसरात सापळा रचला. दरम्यान, संबंधित टेम्पो बांदा चेकपोस्टवरून भरधाव निघून गेला. वनरक्षक वैभव इथापे व सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. मात्र चालकाने वन अधिकाऱ्यांना हुलकावणी देत खामदेव नाका येथे यू-टर्न घेत टेम्पो गोव्याच्या दिशेने नेला.

वन पथकाने पाठलाग सुरू ठेवत पत्रादेवी चेकपोस्टच्या अलिकडे टेम्पो अडवला. मात्र, चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून पलायन केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे २९ घनमीटर खैर लाकूड आढळून आले. या खैर लाकडाची अंदाजे किंमत १२ ते १४ लाख रुपये असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीत संबंधित खैर लाकूड व टेम्पो हा वजराट येथील गोविंद गवस यांचा आहे. सदर लाकूड ते दोडामार्ग येथून तळवडे, ता. सावंतवाडी येथे नेत होते, अशी माहिती पुढे आली आहे.

ही कारवाई जिल्हा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी पृथ्वीराज प्रताप यांच्या पथकाने केली. या कारवाईत वनरक्षक वैभव इथापे, अतुल पाटील, प्रकाश रानगीरे, मोहिते तसेच गोवा वन विभागाचे वनरक्षक विशाल परब यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT