कुडाळ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आंदुर्ले ग्रामपंचायतीने गावातील रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ‘पेशंट बँक’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे आजारी रुग्णांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आजारपणाच्या काळात आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागणीनुसार उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास किंवा अन्य रुग्णांना अशा प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासल्यास ती ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची मोठी अडचण दूर होणार असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
पेशंट बँकमधील उपलब्ध साहित्य ग्रामपंचायत आरोग्य विभागाकडे सुपूर्द करताना सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये, माजी सरपंच सौ. आरती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, प्रसाद सर्वेकर, अंजनी पाटकर, सौ. स्मिता पिंगुळकर, सौ. सुप्रिया येरम, आरोग्य सेविका सौ. आर. एस. बागकर, सर्व अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून, गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्याचा मार्ग या ‘पेशंट बँक’मुळे मोकळा झाला आहे.