सिंधुदुर्ग

Ram Navami: आचरा येथे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास प्रारंभ 

अविनाश सुतार


आचरा: कानविंदे यांच्या वाड्यातून पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मूर्ती मोठ्या उत्साहात इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात आज (दि.९)  दुपारी आणण्यात आली. यावेळी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचे मानकरी, देवसेवक, महालदार, निशाण, बावट्या, ढोल-ताशा, मृदुंग आदी सरंजामा उपस्थित होता. 'जय जय रघुवीर समर्थ' अशी ललकारी आसमंतात दुमदुमली. संस्थानी थाटात साजरा होणाऱ्या रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या  दिमाखात सुरूवात झाली. या कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. Ram Navami

रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर तसेच आजूबाजुला असणारी मंदिरे विद्युत रोषणाईने सजविली आहेत.  रामेश्वर मंदिरासमोर सकाळी शाही गुढी उभारण्यात आली. त्यानंतर दुपारी रामेश्वर मंदिरात रघुपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. Ram Navami

त्यानंतर  रयतेसाठी वाखणकरजोशी,  निलेश सरजोशी यांनी नूतन पंचांगाचे वाचन केले. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. हरीहरांचा आगळा वेगळा संगम असलेल्या आणि प्रत्यक्ष भोळ्या सांब सदाशिवाने त्याच्या आराध्य दैवाचा मोठ्या कौतुकाने केलेला सुख सोहळा म्हणून इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते.

सायंकाळी शाही थाटात 'श्री ' च्या पाषाणाला न्हावन घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर 'श्री' च्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली.  तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपरिक थाटात श्री विष्णूची मूर्ती शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिराभोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभामंडपात हभप. विनोद लक्ष्मण गोखले (वैभववाडी) यांचे भजन होणार आहे. त्यांना पेटीसाथ आनंद लिंगायत (बुरंबाड- संगमेश्वर) तर तबलासाथ किरण लिंगायत (बुरंबाड-संगमेश्वर) हे करतील. असा दिनक्रम दररोज ललिता पंचमीपर्यंत चालणार आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, फलटण, कोल्हापूर आदी भागातून बँडपथक दाखल होणार आहेत.

Ram Navami रामनवमी उत्सवात  विविध कार्यक्रमाची मेजवानी

मंगळवार, दि.९ रोजी गुढीपाडव्यानिमित्त दुपारी १२:०० वाजता पंचांग वाचन, रघुपती पूजा व आरती, १० ते १९ एप्रिलपर्यंत सकाळी १०:०० वाजता दरबारी गायन, दुपारी १२:३० वाजता रघुपती आरती, सायंकाळी ४:०० वाजता माखण (पूजा), ५:०० वाजता सभामंडपातील पुराण वाचन, ६:०० वाजता दरबारी गायन, रात्री ८:०० वाजता महापूजा, मंदिरातील पुराण वाचन, रघुपती आरती, पालखी सोहळा, पालखीनंतर कीर्तन. हे दैनंदिन प्रतिवर्षाप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार,दि.१२ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० वाजता गायक कु.अर्णव बुवा यांचे गायन होणार आहे.

शनिवार, दि.१३ रोजी सकाळी १०:०० वाजता
गायक दिलीप ठाकूर यांचा गायन कार्यक्रम असून, ऑर्गनसाथ भालचंद्र केळुसकर करतील.
सायंकाळी ५:३० वाजता गायक अशोक नाडगीर (हुबळी) यांचे गायन,

रविवार (१४ रोजी) सायंकाळी ५:३० वाजता
गायक कु.सुधांशू सोमण (मिठबांव)
यांचे गायन संवादिनी आनंद लिंगायत, तबला साथ किरण लिंगायत करणार आहेत.

सोमवार, दि.१५ सायंकाळी 5.30 वा. गायन कार्यक्रम गायक जयतीर्थ मेवुंडी (धारवाड) यांचे गायन असून, संवादिनी राया कोरगांवकर तर तबलासाथ रामकृष्ण करंबेळकर यांची लाभेल.

मंगळवार, दि.१६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता गायक भुवनेश कोमकली (इंदोर) यांचे गायन असून,संवादिनी राया कोरगांवकर, तबला साथ मयांक बेडेकर यांची असेल.

बुधवार, दि.१७ रोजी रामनवमी सोहळा. यात रामजन्माचे कीर्तन कीर्तनकार मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) हे कीर्तन सादर करतील. सायंकाळी ५:३० वाजता गायक आनंद भाटे (पुणे) यांचा गायन कार्यक्रम होणार आहे.

सोमवार दि.२२ रोजी रात्री ११:०० वाजता हनुमान जयंतीनिमित्त श्री माउली प्रतिष्ठान, पाटपंचक्रोशी, पाट यांचे रामकृष्ण हरी प्रकाशित, लंबोदर प्रोडक्शन मुबंई प्रस्तुत मनाला चटका देणारे दोन अंकी नाटक  महानिद्रा
(लेखक व दिग्दर्शक विनय केळुसकर, निर्माते डी. टी. मेथर).

मंगळवार, दि.२३ रोजी हनुमान जयंतीनिमित्त पहाटे पालखीनंतर श्री हनुमान जन्म. त्यानंतर बुवा मिलिंद बुवा कुळकर्णी (रामदासी) यांचे कीर्तन

या  रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT