कुडाळ : कुडाळ-चेंदवण परिसरात झालेल्या सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणातील संशयित सिद्धेश शिरसाट यांच्या कुटुंबाकडे आपण ॲड. किशोर वरक याच्या सूचनेनुसार 10 लाख रुपयांची खंडणी मागितले, अशी कबुली या प्रकरणातील संशयित सुरेश दुर्गा झोरे यांने पोलिस चौकशीत दिली, अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली.दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित ॲड. किशोर वरक हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे. हवालदार कृष्णा केसरकर, संजय कदम, योगेश वेंगुर्लेकर व प्रमोद काळसेकर यांनी त्यास सहाय्य केले आहे. तपासानुसार, सुरेश झोरे याने पोलिस कोठडीत सांगितले की, ॲड. किशोर वरक यांच्या सांगण्यानुसार आपण सिद्धेश शिरसाट यांच्या कुटुंबाकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी 1 लाख रुपये ॲडव्हान्स स्वरूपात वरक याने स्वीकारले होते. ही घटना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते 15 जुलै 2025 दरम्यान घडली. सुरेश झोरे आणि किशोर वरक यांच्या मोबाईलवरील ऑडिओ क्लिप्स तपासल्या जात आहेत. या ऑडिओ क्लिप्समधील आवाजाचे नमुने न्यायालयात हजर केले जातील. पोलिसांनी सिद्धेश शिरसाट यांच्या कुटुंबाकडून या व्यवहाराची नोंद घेतली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्या पासून ॲड. किशोर वरक फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शनिवारी पोलिसांनी खानोली येथील त्याच्या घरी भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो सापडला नाही. पोलिसांनी याबाबतचा तपास कसून सुरू ठेवला असून, इतर काही पुरावे सापडतात का, यावरही लक्ष केंद्रित केले आहे.