कणकवली: समस्त सिंधुदुर्गवासीयांचे श्रद्धास्थान असलेले योगियांचे योगी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवास रविवारपासून कणवलीतील आश्रमात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे काकड आरतीने या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर बाबांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांचा सुरू झालेला ओघ रात्री उशिरापर्यंत कायम होता. पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांनी या
पुण्यतिथी महोत्सवाला उपस्थिती दर्शवत समाधी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री भालचंद्र बाबांच्या या पुण्यतिथी महोत्सवामुळे अवघी कनकनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. पहाटे बाबांच्या काकड आरतीसाठी शेकडो भाविक भक्तांनी आश्रमात हजेरी लावली होती. समाधी पूजन आणि काकड आरतीनंतर भाविकांची दर्शनासाठी रांग सुरू झाली.
सकाळी सर्व भक्तांच्या कल्याणार्थ भालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठान विधी झाला. दुपारी महाआरती झाली. त्यानंतर सुरू झालेल्या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. दरम्यान अनेक भजनीबुवांची भजने झाली. सायंकाळी सार्यांनाच उत्सुकता होती ती कीर्तन महोत्सवाची.
रविवारी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.कौस्तुभ बुवा परांजपे (रा. पुणे) यांचे ‘भीष्मप्रतिज्ञा’ या विषयावर कीर्तन झाले.24 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. प्रणवबुवा जोशी (रा. जालना) यांचे ‘गर्वहरण’ या विषयावर कीर्तन होणार आहे. रविवारी कीर्तनाचाही मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले. बाबांच्या या उत्सवाला पुढील चार दिवस असाच भाविकांचा ओघ सुरू राहणार आहे. या उत्सवात बाबांच्या जयघोषाने अवघी कनकनगरी दुमदुमुन गेली आहे.
बॉक्स कर्मचार्यांना युनिफॉर्म !
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे पुण्यतिथी उत्सवाचे निमित्त साधत सर्व कर्मचार्यांना एकाच रंगाचा युनिफॉर्म देण्यात आला. भालचंद्र महाराज आश्रमाचे भालचंद्र महाराज संस्थानात रूपांतर झाल्यानंतर संस्थानचे प्रस्थ वाढत आहे. आपल्या संस्थेतील कर्मचारी तसेच इतर सुविधायांकडे संस्थानच्या वतीने लक्ष देत असल्याचे संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितले.