Fraud Case file photo
सिंधुदुर्ग

Fraud Case | दोडामार्ग तालुक्यातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Fraud Case | शिवम असोसिएटस्'मधील आर्थिक घोटाळा

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा

बेळगावस्थित बहुचर्चित 'शिवम असोसिएटस्' या आर्थिक संस्थेभोवती सीआयडी चौकशीचे वादळ घोंघावू लागल्याने दोडामार्ग तालुक्यातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरघोस परताव्याच्या आमिषाला भुलून लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या अनेक ठेवीदारांचे धाबे दणाणले असून, या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करणारे काही जण अचानक गायब झाल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी 'शिवम असोसिएटस्'च्या व्यवहारांबाबत गंभीर अनियमिततांचा पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरासह ग्रामीण भागातही चिंतेची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे माजी सैनिक, काही प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये सक्रिय असलेल्या अनेकांनी या संस्थेशी थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध ठेवल्याची माहिती समोर येत आहे. 'शिवम'चा प्रमुख सूत्रधार शिवानंद सिद्धाप्पा नीलणावर याच्या अटकेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच, संस्थेत पैसे गुंतवणाऱ्यांसोबतच लोकांना बेळगावपर्यंत घेऊन जाणारे एजंट, दलाल आणि शिफारसदार यांचीही झोप उडाली आहे.

सीआयडीच्या चौकशीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, बेळगावनंतर आता तपासाची धग दोडामार्गपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील काही संशयितांच्या घरांवर चौकशी किंवा छाप्यांची कारवाई होऊ शकते अशी कुजबुज सुरू असून, संभाव्य चौकशीच्या भीतीने काही जण भूमिगत झाल्याची जोरदार चर्चा शहरात ऐकू येत आहे. संपूर्ण प्रकरणामुळे दोडामार्गात एक प्रकारचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, अनेक गुंतवणूकदार आता आपल्या पैशांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत पडले आहेत.

कर्नाटक पोलिसांचे पथक दोडामार्गात ?

'शिवम असोसिएटस्' प्रकरणातील आर्थिक गैख्यवहार आणि त्यातील मुख्य सूत्रधारांच्या चौकशीचा वेग वाढत असतानाच, कर्नाटक पोलिसांचे विशेष पथक रविवारी पहाटे सुमारास दोडामार्गात दाखल झाल्याची जोरदार चर्चा दिवसभर रंगत होती. शिवमशी संबंधित व्यक्तींवर पोलिसांची बारकाईने नजर असल्याचेही बोलले जात असून, येत्या काही दिवसांत तपास तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT