सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेण्यात आला असून, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब गुरुवारी संपूर्ण वेंगुर्ले तालुका आणि शहर कार्यकारिणी बरखास्त केल्याचे जाहीर केले. यासोबतच तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, या रिक्त पदावर सचिन देसाई यांची प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून तातडीने निवड जाहीर करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीनंतर वेंगुर्ला शिवसेनेत सुरू असलेल्या पदाधिकार्यांच्या राजीनामा नाट्याला अखेर जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पूर्णविराम दिला. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्यासह काही अन्य पदाधिकार्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामे दिल्यानंतर हे नाराजीनाट्य सुरू झाले होते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
राजीनामा देणार्यांना थेट इशारा
कार्यकारिणी बरखास्तीच्या निर्णयामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ झाल्याचे दिसून येत असले, तरी श्री. परब यांनी पक्षात कोणतीही नाराजी नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, प्रत्येकाने वैयक्तिक कारणांसाठी आपले राजीनामे दिले आहेत, परंतु, पक्षाचे हित लक्षात घेत ही कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी पक्षातून बाहेर पडणार्यांना आणि अंतर्गत विरोधकांना थेट इशारा दिला. श्री. परब म्हणाले, राजीनामे देणार्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, संजू परब कधीही परिणामांची चिंता करीत नाहीत.
मला राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. श्री. परब यांनी यावेळी शिवसेना वेंगुर्ले तालुका महिला आघाडी प्रमुख निशा शेटकर तसेच उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर यांचाही राजीनामा मंजूर केल्याचे सांगितले. ज्यांनी ज्यांनी राजीनामे दिले आहेत, त्या सर्वांचे राजीनामे मंजूर करून सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्याचे सांगितले.
राजकारणातील मी अनुभवी प्लेयर!
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीवर बोलताना संजू परब यांनी आपली रणनीती आणि अनुभव स्पष्ट केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर काय करायचे आहे, त्याची रणनीती मला पूर्णपणे माहीत आहे, कारण मी राजकारणात नवखा नाही, तर अनुभवी प्लेयर आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर नव्याने कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असून, तोपर्यंत प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून सचिन देसाई यांच्याकडे धुरा सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.