देवगड: देवगड- नांदगाव मार्गावर तोरसोळे फाट्यानजीक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शिरगाव- वरची बाजारपेठ येथील दुचाकीस्वार मंदार राजेंद्र माळवदे (37) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याच्या दुचाकीवरील सहप्रवासी तुषार जितेंद्र लालका (20, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. शिरगाव बाजारपेठ) हा गंभीर जखमी झाला.
त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री 8 वा. च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. मंदार माळवदे हा गुरुवारी रात्री अॅक्सेस स्कूटी घेऊन शिरगाव बाजारपेठेतील प्लास्टर कामगार तुषार लालका याच्यासमवेत तळेबाजार येथे जात होता.
त्यांची दुचाकी तोरसोळे फाट्यानजीक आली असता मागाहून येणार्या गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दुचाकीस्वार मंदार माळवदे याचे लक्ष विचलित झाले. तो चालत्या दुचाकीवरून मागे पाहत असतानाच त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीवरून बाजूच्या चरात आदळली. यात स्वार मंदार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला.
तर तुषार लालका याच्या पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या देवगडचे नगरसेवक विशाल मांजरेकर व सामाजिक कार्यकर्ते संजय वाळके कारने देवगडच्या दिशेने येत होते. तोरसोळे फाट्यानजीक झालेला हा अपघात त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथे थांबून मदतकार्य राबविले. तसेच देवगड पोलिसांना घटनेची माहिती दिली.
गंभीर जखमी तुषार लालका याला ग्रामस्थांच्या मदतीने शिरगाव प्रा. आ. केंद्रात हलविण्यात आले. मात्र, गंभीर दुखापत असल्याने अधिक उपचारासाठी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. भाजपचे पदाधिकारी मिलिंद साटम, भाजयुमोचे तालुकाप्रमुख अमित साटम, देवगड उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, अमित साळगावकर यांच्यासह शिरगाव परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत मदत केली.
देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे, नीलेश पाटील, दीपेश तांबे, चालक भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. देवगड ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.
मंदार माळवदे हे लोकमान्य को. ऑप. सोसायटीच्या शिरगाव शाखेत शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगा व मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. शिरगाव बाजारपेठ शुक्रवारी बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.