देवगड : ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या परतीच्या पावसाचा देवगड तालुक्याला तडाखा बसला. या पावसामुळे शिरगाव- राकसघाटी, निमतवाडी परिसरातील 12 घरांचे चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत नुकसानीचा पंचनामा सुरू होता.
बुधवारी सायंकाळी 4 वा.नंतर ढगांचा गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस कडक ऊन पडल्यानंतर बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, मात्र वीजांच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाचा तडाखा शिरगाव भागाला बसला.
देवगड- नांदगाव मार्गावर शिरगाव ग्रामपंचायतीनजिक रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने झाड बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस थांबल्यानंतर दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला.