Shaktipeeth Highway Route Demand 
सिंधुदुर्ग

Shaktipeeth Highway Route Demand | शक्तिपीठ महामार्ग कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यातून जावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची मागणी : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची भेट घेणार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : राज्य शासनाच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेला शक्तिपीठ महामार्ग राधानगरी परिसरापर्यंत येत असून पुढे तो चंदगड-आजरा मार्गे आंबोली, झोळंबे, पडवे, चौकुळ, केसरी, बांदा-पात्रादेवी अशी त्याची नवीन अलायमेंट आहे. जर हा महामार्ग राधानगरीपर्यंत येत असेल आणि त्याचा फायदा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयाला व्हायचा असेल तर हा महामार्ग राधानगरी, फोंडा, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, बांदा अशा पद्धतीने होणे आवश्यक आहे. हा महामार्ग राधानगरीतून फोंडाघाटमार्गे सिंधुदुर्गला जोडला गेल्यास सिंधुदुर्गला त्याचा विकासात्मकदृष्ट्या फायदा होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संदेश पारकर म्हणाले, राधानगरी ते सिंधुदुर्ग हे अंतर सुमारे ६५ किमी. एवढेच आहे. अशा पद्धतीने हा महामार्ग झाल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर हे अंतर सव्वातीन-साडेतीन तासावरून सव्वा तासावर येणार आहे. त्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला देखील जोडण्यात यावा. तसेच प्रस्तावित संकेश्वर रेडी व घोडगे-पाटगाव या मार्गांना देखील हा महामार्ग जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन, व्यापाराला चालना मिळून रोजगार निर्मितीला बळ मिळणार आहे.

त्याचबरोबर धार्मिक पर्यटनाला त्याचा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून त्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडी मोतीतलाय, दाजीपूर अभयारण्य, आंबोली व सावडाव धबधबा, रांगणागड, देवगड-मालवण वेंगुर्ला किनारपट्टी अशा पर्यटन स्थळांना फायदा होणार आहे. 'शक्तिपीठ' संकल्पनेनुसार कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर, धामापूर येथील भगवती मंदिर, परमहंस भालचंद्र महाराज संस्थान यांसारख्या धार्मिक स्थळांना थेट फायदा होऊन धार्मिक पर्यटन वाढेल.

सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येतात, राधानगरी मार्गे कनेक्टिव्हिटी दिल्यास ही संख्या आणखी वाढेल. जर महामार्ग थेट गोव्यात उतरवला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्यात जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल. भविष्यात पर्यायी मार्ग विकसित झाल्यास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कमी होऊन कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस, कसाल या शहरांवर आर्थिक परिणाम होऊ शकतो. राधानगरीमार्गे हा मार्ग सिंधुदुर्गात आल्यास चिपी विमानतळ, देवगड व रेडी बंदरांशी जोडणी केल्यास संपूर्ण कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळेल. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने, त्याचा प्राथमिक फायदा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, ही आमची ठाम भूमिका असल्याचे पारकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा असून, या महामार्गामुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळणे अत्यावश्यक आहे असेही ते म्हणाले.

सह्याद्री पायथ्याशी असलेल्या गावांचा विकास होणार

संदेश पारकर म्हणाले, हा महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडावा किंवा ग्रीनफिल्ड संकल्पनेनुसार सह्याद्री पायथ्याशी असलेल्या गावांमधून समांतर मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत नेण्यात यावा. या निर्णयामुळे सह्याद्री पायथ्याच्या गावांचा विकास, आर्थिक दळणवळण व रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी देणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT