

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका सभागृहातील तीन महिन्यानंतर होणारी स्थायी समिती सदस्य पदाची निवड बुधवारी (15) रोजी झालेल्या महासभेत बंद पाकिटातच राहिली. सभेच्या शेवटी विषय पत्रिकेवरील स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडीसाठी गटनेत्यांनी नावे देण्याची घोषणा करण्यात आली. या दरम्यान सर्व गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात महापौर नारायण चौधरी यांच्याकडे सुपूर्द केली. परंतु स्थायी समितीस सदस्यांची नावे सभागृहात जाहीर न करताच सभा समाप्तीची घोषणा पीठासन अधिकारी महापौर यांनी केली. त्यामुळे अनेकांकडून तर्क लढविले जात आहेत.
भिवंडी महानगर पालिकेच्या बुधवारी (15) एप्रिलच्या महासभेत विषय पत्रिकेवरील विषय सुरू करण्याआधी पीठासन अधिकारी महापौर नारायण चौधरी यांनी सभागृहाला आपले प्रश्न मांडण्याची विनंती केली. त्यानंतर डंपिंग ग्राउंड वरील गुटखा चोरीचा मुद्दा नगरसेवक कमलाकर पाटील,अँड वैभव भोईर, रोहिदास वाघमारे यांनी उपस्थित करीत पालिका मालकीच्या डंपिंग ग्राउंडवरील नष्ट केलेला गुटखा पालिकेची यंत्रणा वापरून चोरी केल्यानंतर ही पालिका कारवाई करीत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
यावर महापौर नारायण चौधरी यांनी पालिका प्रशासनाला तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या.त्यानंतर पाणी प्रश्नावर अनेक सदस्यांनी आपल्या प्रभागातील पाणीटंचाईच्या मुद्द्याला वाचा फोडली. यामध्ये काही ठिकाणी रात्री अवेळी पाणी सोडले जात असल्याचा तर काही भागात कमी दाबाने होत असल्या बाबत ओरड केली.
या चर्चेमध्ये संदीप भोईर, वनिता भगत, रोमा आळशी,फराज बहाउद्दीन,जावेद दळवी यांसह अनेकांनी चर्चा केली.भिवंडी पालिका स्थायी समिती सदस्य निवड बंद पाकिटातच राहिली आहे. ज्यामध्ये काही गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात कोरा कागद दिला तर काही गटनेत्यांनी दिलेली नावे बदलण्याची शक्यता अनेकांकडून चर्चिली जात आहे. याबाबत महापौर नारायण चौधरी यांना विचारले असता स्थायी समिती सदस्यांची नावे गुरुवारी (16) रोजी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले.
तर धोकादायक इमारती पाडकामात ठेकेदाराचा भ्रष्टाचार, अनेक बेघर
शहरातील धोकादायक इमारती पाडकाम करण्यासाठी नेमलेले ठेकेदार पालिका अधिकारी व जमीन मालक यांच्याशी संगनमत करून तेथील कुटुंबियांना बेघर करण्याचा डाव खेळला जात असल्याचा आरोप भाजपा गटनेता संतोष शेट्टी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला. त्यावर बोलताना जमीनमालक तेथील कुटुंबियांना बेघर करून जमीन बळकावत असून,पालिका अधिकारी अशा कामांमध्ये तत्परता दाखवत असल्याचा आरोप केला.