कुडाळ : कुडाळ-सरंबळ बसफेरी वारंवार उशिराने सुटत असल्याने संतप्त ज्येष्ठ नागरिक प्रवाशाने गुरूवारी सायंकाळी बसस्थानकात एसटी गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला. कुडाळ-सरंबळ ही 4 वा. सुटणारी एसटी गुरूवारी सायंकाळी 5.15 वा. झाले तरी न सुटल्याने या प्रवाशाने चक्क बसस्थानकातच आंदोलनाची भूमिका घेत अन्य एसटी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्या प्रवाशाला समज देत बाजुला केले. दरम्यान आगाराच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रवाशाने पोलिसांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली.
कुडाळ बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणार्या एसटी बसफेर्या सातत्याने उशिराने सुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होते. कुडाळ-सरंबळ ही नियोजित 4 वा. सुटणारी एसटी 5.15 वा.झाले तरी सुटली नाही. याबाबत त्या प्रवाशासह अन्य प्रवाशांनी बसस्थानकात चौकशी केली असता, समाधानकारक उत्तर प्रवाशांना मिळाले नाही. त्यामुळे या संतप्त प्रवाशाने थेट बसस्थानकातील अन्य एसटी बसेससमोर उभे रहात बसेस बसस्थानकाबाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
या प्रकारामुळे एसटी अधिकार्यांची तारांबळ उडाली. कुडाळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कॉन्स्टेबल सचिन गवस आणि गणेश चव्हाण यांनी बसस्थानकात जात आंदोलनकर्त्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला बाजूला घेत त्याची समजूत काढली. अशाप्रकारे सार्व. सेवेत अडथळे निर्माण करणे योग्य नाही. बस उशिराने सुटत असेल तर तुम्ही एसटी प्रशासनाकडे कायदेशीर मार्गाने लढू शकता, असे सांगत पोलिसांनी त्या प्रवाशाची समजूत काढली. मात्र आगाराच्या गोंधळी कारभाराबाबत प्रवाशाने तीव्र नाराजी व्यक्त केली.