सावंतवाडी : कोट्यवधी रुपये खर्चून कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले असले तरी पावसात भिजणार्या प्रवाशांसाठी साधे छतही उभारण्यात आलेले नाही. याचा फटका शुक्रवारी सायंकाळी कोकणकन्या एक्सप्रेसच्या प्रवाशांना बसला. संततधार पावसात तब्बल अर्धा तास भिजत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आल्याने त्यांनी प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला.
शुक्रवारी सायंकाळी 4 वा.पासून सावंतवाडीत जोरदार पाऊस सुरू होता. सायंकाळी 7 वा. 40 मिनिटांनी कोकणकन्या एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्र.2 वर आली. यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 1 वरून 2 वर जाण्यासाठी प्रवाशांची धावपळ झाली. सुदैवाने याचवेळी गोव्याकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 1 वर थांबलेली असल्याने काही प्रवाशांना तिच्यातून दुसर्या प्लॅटफॉर्मवर जाता आले. मात्र, ज्या प्रवाशांना मांडवी एक्सप्रेस मिळाली नाही, त्यांना तब्बल अर्धा तास पावसात भिजत प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभे राहावे लागले.
विशेष म्हणजे, प्लॅटफॉर्म क्र.2 वरील 10 ते 15 क्रमांकादरम्यान आणि स्लीपर कोच एस 7 ते एस 1 पर्यंत आणि वातानुकुलीत कोचमधील प्रवाशांनाही पुरेसा निवारा शेडची सोय नव्हती. त्यामुळे प्रवाशांना भिजत उभे राहावे लागले. या प्रवाशांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. ‘स्टेशन बाहेर रंगरंगोटी कशासाठी? जनतेच्या पैशांचा हा अपव्यय आहे. प्रवाशांना उन्हापावसात भिजण्याची वेळ येते आणि लोकप्रतिनिधींनी याची साधी दखलही घेतली नाही,’ अशा शब्दांत प्रवाशांनी आपला रोष व्यक्त केला. अनेकांकडे छत्री नसल्याने त्यांचे सामानही पावसात भिजले.
अखेरीस कोकणकन्या एक्सप्रेस स्थानकात दाखल झाल्यावर भिजलेल्या अवस्थेतच प्रवाशांना डब्यांमध्ये चढावे लागले. मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळ्यात प्रवाशांना कमी-अधिक प्रमाणात याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे स्थानकाबाहेर सुशोभिकरण केले असले, तरी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी छत नसल्याने प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचा आणि पावसाळ्यात पावसाचा सामना करावा लागत आहे. केवळ प्लॅटफॉर्मच नव्हे, तर एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठीही पुरेशी सोय नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणातील सहनशील प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत प्रशासनाने पाहू नये, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.